कल्याण : कल्याण पश्चिमचे माजी आमदार नरेंद्र पवार यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन गांधारी आणि शहाड येथील नव्या उड्डाणपुलांचे काम तातडीने सुरू करण्याची विनंती केली.
गांधारी नदीवरील पुलाचा वापर पडघा, भिवंडी, नाशिक आणि समृद्धी महामार्गासाठी मोठ्या प्रमाणावर होतो. मात्र, हा पूल अरुंद आणि जुना असल्याने वाढत्या वाहतुकीचा भार सहन करणे कठीण झाले आहे. याठिकाणी सहापदरी समांतर उड्डाणपूल उभारण्याची मागणी पवार यांनी गडकरी यांच्याकडे केली.
तसेच, राष्ट्रीय महामार्ग ६१ वरील शहाड उड्डाणपूल दरवर्षी पावसाळ्यात खराब होत असून, त्यामुळे मोठ्या वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. एमएमआरडीएने येथे चार पदरी उड्डाणपूल उभारण्याची घोषणा केली असली, तरी प्रत्यक्ष काम सुरू झालेले नाही. त्यामुळे हे कामही तातडीने सुरू करावे, अशी मागणी करण्यात आली.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी या दोन्ही प्रकल्पांसाठी सकारात्मक प्रतिसाद देत लवकरच आवश्यक कार्यवाही केली जाईल, असे आश्वासन दिल्याचे पवार यांनी सांगितले.