बुलढाणा : शिंदे गटाची पहिली यादी जाहीर झाली असून यामध्ये बुलढाणा लोकसभा मतदारसंघासाठी विद्यमान खासदार प्रतापराव जाधव यांना उमेदवारी देण्यात आली आहे. मात्र पक्ष आदेश न मानता संजय गायकवाडांनी तडकाफडकी जाऊन लोकसभा निवडणुकीसाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यामुळे बुलढाणा जागेवरुन शिंदे गटात मोठा पेच निर्माण झाला आहे.
आमदार संजय गायकवाड आपला अर्ज मागे घेतली असं खासदार प्रतापराव जाधव म्हणाले आहेत. मात्र आपण अर्ज भरला तो निवडणूक लढवण्यासाठी तो मागे घेणार नसल्याची प्रतिक्रिया आमदार संजय गायकवाडांनी दिली आहे. मी बंड केलेलं नाही मात्र मी माझ्या उमेदवारीवर ठाम आहे. ४ तारखेला कळेल काय होतं, असं संजय गायकवाड म्हणाले.
विद्यमान खासदार प्रतापराव जाधव यांनी सलग तीनवेळा या मतदारसंघातून विजय मिळवला आहे. २००९, २०१४, २०१९ या निवडणुकीत जाधव यांनी विजय मिळवला होता. आता चौथ्यांदा ते रणांगणात उतरण्यासाठी तयार झाले आहेत.
संजय गायकवाड लढण्यावर ठाम…
“मी निवडणूक लढवण्याच्या उद्देशानं अर्ज दाखल केला आहे. लोकसभेसाठीचा उमेदवारी अर्ज मी अचानकपणे दाखल केलेला नाही. काल (गुरुवारी) उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठीचा पहिला दिवस होता. मी आधीपासूनच ठरवलेलं लोकसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचं. फक्त दरवेळी मी पाच-पन्नास हजार लोकं सोबत घेऊन जातो आणि उमेदवारी अर्ज दाखल करतो. यावेळी फक्त पाचचजणांसोबत जाऊन उमेदवारी अर्ज दाखल केला.”