भारतीय जनता पक्षाने आतापर्यंत उत्तर प्रदेशात केवळ 51 जागांसाठी आपले उमेदवार जाहीर केले आहेत. 23 जागांसाठीचे उमेदवार अद्याप जाहीर झालेले नाहीत. सहा जागा मित्रपक्षांना देण्यात आल्या आहेत. यावेळी पक्षाकडून पिलीभीतचे खासदार वरुण गांधी यांना तिकीट देण्यात येईल की नाही, याबाबत शंका आहे. भाजपकडून तिकीट न मिळाल्यास वरुण गांधी अपक्ष म्हणून अर्ज दाखल करू शकतात, असा दावा सूत्रांनी केला आहे.
यावेळी कोअर कमिटीच्या बैठकीत वरुण गांधी यांना पिलीभीतमधून तिकीट देण्यास सर्व राज्यस्तरीय भाजप नेत्यांनी विरोध केल्याची चर्चा आहे. पिलीभीतमध्ये पहिल्या टप्प्यात मतदान होत आहे. यासाठी 20 मार्चपासून नामांकन प्रक्रिया सुरू झाली आहे. आतापर्यंत या जागेवरून भाजप किंवा सपाने उमेदवार दिलेला नाही. गेल्या अनेक वर्षांपासून वरुण गांधी आपलाच पक्ष आणि सरकारविरोधात वक्तव्य करीत आहेत. त्यामुळे त्यांना पुन्हा तिकीट दिले जाणार नाही, अशी भीती व्यक्त होत आहे.
अखिलेश यांच्या बैठकीत वरुण गांधी यांच्या नावाची चर्चा झाली. यंदा अखिलेश यादव पिलीभीतमध्ये वरुण गांधींना सपाचे उमेदवार म्हणून उभे करू शकतात, असंही सांगितलं जात आहे. पिलीभीत सपाचे जिल्हाध्यक्ष जगदेव सिंह म्हणाले की, अखिलेश यादव यांच्यासोबत झालेल्या बैठकीत वरुण गांधी यांच्यासह इतर उमेदवारांच्या नावावरही चर्चा झाली.
विशेष म्हणजे, वरुण गांधी यांनी गेल्या 3 वर्षांपासून विविध बाबींवर आपल्याच पक्षाला कडाडून विरोध केला आहे. अलीकडेच पीएम मोदींच्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंग दरम्यान, ते इतर भाजप नेत्यांसोबत स्टेज शेअर करताना दिसले. या कार्यक्रमात वरुण गांधींनीही पीएम मोदींचे कौतुक केले. मात्र असे असले तरी वरुण गांधी यांना तिकीट देण्याबाबत भाजप फारशी सकारात्मक दिसत नसल्याचं चित्र आहे.