नागपूर : मागील 10 वर्षात पंतप्रधान मोदींनी देशाचा जो आर्थिक विकास केला, त्यामुळे देशाचे नाव संपूर्ण जगात सन्मानाने घेतल्या जात आहे. स्टार्टअप इंडिया आणि मोदींच्या इतर योजनांमुळे आपला देश जगातील पाचवी मोठी आर्थिक महासत्ता बनला आहे, अशा शब्दात भाजप युवा मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार तेजस्वी सूर्या यांनी पंतप्रधान मोदींचे कौतुक केले. G20 संमेलनामुळे देशात सर्वच क्षेत्रात प्रचंड प्रगती होत आहे. वैद्यकीय शिक्षणासाठी मोदीजींनी मागील 10 वर्षात मोठ्या तरतुदी करून प्रत्येक जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना लाभ मिळवून देण्याचा प्रयत्न केला आहे. एनकेपी साळवे वैद्यकीय महाविद्यालय हे देशातील सर्वोत्कृष्ट वैद्यकीय महाविद्यालय आहे. देशहिताच्या राजकारणामुळे देशाची आर्थिक प्रगती होत असते, ती मोदीजींनी केली.
राजकीय पक्ष आताचे युवक आणि विद्यार्थ्यांचे व्होट विकत घेऊ शकत नाही. म्हणूनच देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी युवक आणि विद्यार्थ्यांनी आपली जबाबदारी ओळखावी, असं प्रतिपादन भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. तेजस्वी सूर्या यांनी केले. व्हीएसपीएम अकॅडमी ऑफ हायर एज्युकेशनद्वारा संचालित एनकेपी साळवे वैद्यकीय महाविद्यालय व लता मंगेशकर हॉस्पीटल, डिगडोह हिल्स, हिंगणा रोड, नागपूर येथे आयोजित ‘वैद्यकीय विद्यार्थ्यांशी संवाद’ कार्यक्रमात ते बोलत होते. याप्रसंगी त्यांनी लता मंगेशकर हॉस्पीटल येथील ‘खाजगी कक्षां’चे उद्घाटन केले. अत्याधुनिक आकस्मिक सेवा, आयसीयू, ऑपरेशन थिएटर आणि अत्याधुनिक लायब्ररी यांची त्यांनी पाहणी केली आणि उपलब्ध सोयी-सुविधांची स्तुती केली.
प्रास्ताविक करताना संस्थेचे उपाध्यक्ष माजी आमदार डॉ. आशिष देशमुख म्हणाले, गान कोकिळा स्व. लता मंगेशकर यांच्याकडून मिळालेल्या स्फूर्तीने रुग्णालयाचे कार्य अविरत सुरु असून लता मंगेशकर यांच्या नावाने कार्यरत असलेले हे एकमेव रुग्णालय आहे. मानवतेच्या भावनेतून रुग्णांना येथे सेवा दिली जाते आणि वैद्यकीय महाविद्यालयाच्या मार्फत उच्च दर्चाचे शिक्षण विद्यार्थ्यांना दिले जाते. भविष्यातील वैद्यकीय शिक्षण हब म्हणून नागपूर उदयास येत आहे. मोदीजींनी जगात देशाची मान उंच केली आहे. ग्रामीण भारत देखील प्रगत होत आहे. ‘मोदीजी की गारंटी’ यावर लोकांचा पूर्ण विश्वास आहे.