Twitter : @vivekbhavsar
मुंबई
संसदेत महिलांसाठी लोकसभा आणि राज्य विधानसभेत 33 टक्के जागा आरक्षित करण्याचे विधेयक मांडले गेले असतांना आणि त्यावर चर्चा सुरू असतांना भारतीय जनता पक्षाने यवतमाळ – वाशिम मतदारसंघातील शिवसेनेच्या (शिंदे गट) विद्यमान खासदार भावना गवळी यांना तिकीट देवू नका, अशा स्पष्ट सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिल्याची माहिती भाजपमधील वरिष्ठ सूत्रांनी राजकारण शी बोलतांना दिली. (ही बातमी लिहून झाली तेव्हा लोकसभेत हे विधेयक मंजूर झाले होते.)
भारतीय जनता पक्षाने एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या विद्यमान खासदारांच्या मतदारसंघात त्यांच्या विश्वासातील आणि नेहमीच्या संस्थेकडून सर्वेक्षण केले आहे. या सर्वेक्षणाच्या अहवालानुसार शिंदे गटातील चार खासदारांना पुन्हा उमेदवारी देण्यास भाजपने विरोध केला आहे. त्यात भावना गवळी यांचे स्थान पहिल्या क्रमांकावर आहे. लोकसभेत आज महिलांना 33 टक्के आरक्षण देण्याच्या विधेयकावर चर्चा सुरू असतांना सलग पाच वेळ निवडून आलेल्या महिला खासदाराला तिकीट देऊ नका, अशा सूचना भाजपकडून आल्याने शिंदे गटात आणि यवतमाळ – वाशिम मतदारसंघात कमालीची नाराजी पसरली आहे.
दरम्यान, सक्तवसुली संचलनालयाच्या कारवाईमुळे भावना गवळी या शिंदे गटात सामील झाल्याची मतदारसंघात चर्चा असल्याचा दावा भाजपच्या नेत्याने केला. भाजपने शिंदे गटाचे मंत्री संजय राठोड यांच्या नावाची शिफारस केली होती, मात्र, राज्यात मंत्री राहण्यात जे फायदे आहेत, ते खासदार होण्यात नाहीत असे सांगून संजय राठोड यांनी लोकसभा निवडणूक लढण्यास नकार दिल्याची माहिती भाजपमधील सूत्रांनी दिली. अशा परिस्थितीत भाजपा ही जागा शिंदे गटाकडून काढून घेऊन त्याठिकाणी पक्षाचा उमेदवार देऊ शकेल आणि त्यादृष्टीने भाजपने चाचपणी सुरू केल्याचे सांगितले जात आहे. भाजपकडून मदन येरावर यांचे नाव पुढे केले जात आहे.

यवतमाळ – वाशिम मतदारसंघात 2019 च्या लोकसभा निवडणुकीत कॉँग्रेसचे माणिकराव ठाकरे यांनी भावना गवळी यांच्याविरोधात चांगली लढत दिली होती. ठाकरे यांचा 1 लाख 17 हजार 939 मतांनी पराभव झाला होता. भावना गवळी यांना 5 लाख 42 हजार 98 मते तर ठाकरे यांना 4 लाख 24 हजार 159 मते मिळाली होती. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत यवतमाळच्या जागेवर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना दावा करणार असून शिवसेनेचा खासदार येथून निवडून आला असल्याने कॉँग्रेस ही जागा उद्धव सेनेला सोडेल, अशी माहिती उद्धव सेनेतील सूत्रांनी दिली.
कॉँग्रेसचे माजी मंत्री संजय देशमुख यांनी नुकताच उद्धव सेनेत प्रवेश केला आहे. यवतमाळ – वाशिम मतदारसंघात मराठा समाजाचे प्राबल्य आहे. देशमुख यांनी 2019 च्या विधानसभा निवडणुकीत दिग्रस मतदारसंघातून संजय राठोड यांच्याविरोधात अपक्ष उमेदवार म्हणून लढत दिली होती. या निवडणुकीत त्यांनी 75 हजार मते घेतली होती. यातून देशमुख यांचे प्राबल्य दिसून येते, याकडे उद्धव सेनेचे नेते लक्ष वेधत आहेत.

यवतमाळ – वाशिम लोकसभा मतदारसंघातील यवतमाळ (मदन येरावर – भाजप), पुसद (इंद्रनील नाईक – राष्ट्रवादी कॉंग्रेस), कारंजा (राजेंद्र पटनी – भाजप) आणि दिग्रस (संजय राठोड – शिवसेना) हे चार विधानसभा मतदारसंघ यवतमाळ जिल्ह्यातील आहेत, तर राळेगाव (अशोक ऊइके – भाजप) आणि वाशिम (लखन मलिक – भाजप) हे दोन मतदारसंघ वाशिम जिल्ह्यातील आहेत. सहा पैकी चार मतदारसंघात भाजप तर एका मतदारसंघात शिवसेनेचा आमदार असल्याने भावना गवळी यांच्यावर परमेश्वर कृपा आहे आणि त्या काहीही काम न करताही निवडून येवू शकतील, अशी खंत विरोधी पक्षातील एका स्थानिक नेत्याने बोलून दाखवली. मात्र, त्याचवेळी यंदा भावना गवळी यांना यंदा निवडणूक सोपी नसेल, असा दावाही या नेत्याने केला.
या मतदारसंघात बंजारा समाजाची सुमारे साडेतीन लाख मते आहेत. त्यामुळे या मतदारसंघातून बंजारा किंवा मराठा समाजाचा उमेदवारच निवडून येऊ शकेल, असा दावा केला जात आहे. मदन येरावर हे अल्पसंख्य समाजातील असल्याने त्यांच्यासाठी लोकसभा निवडणूक सोपी नसेल असा दावा कॉँग्रेसकडून केला जात आहे.
ही जागा कॉँग्रेसने आपल्याकडे ठेवली तर माणिकराव ठाकरे उमेदवार असू शकतील. शिवाजीराव मोघे देखील तिकीट मागू शकतील, अशी शक्यता वर्तवली जात आहे. उद्धव सेनेकडून संजय देशमुख उमेदवार असू शकतील. पोहरा देवस्थानचे पुजारी देशमुख यांच्यासोबतच उद्धव सेनेत आल्याने आणि बंजारा समाजात त्यांचा प्रभाव असल्याने मराठा आणि बंजारा समाजाची मते ठाकरे सेनेच्या उमेदवाराच्या पारड्यात पडतील आणि त्यांच्यासाठी ती निर्णायक ठरतील, असा दावा उद्धव सेनेकडून केला जात आहे.