मुंबई : “भारताच्या कष्टकरी जनतेचा पोशाख असलेली लुंगी ठाकरे बंधूंची पुंगी वाजवल्याशिवाय राहणार नाही,” असा घणाघात भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते निरंजन शेट्टी यांनी केला आहे. रविवार, ११ जानेवारी २०२५ रोजी ठाकरे बंधूंच्या जाहीर सभेत मनसेचे स्वयंघोषित प्रवक्ते संदीप देशपांडे यांनी दक्षिण भारतीय नागरिकांना उद्देशून केलेल्या “उठाव लुंगी, बजाव पुंगी” या वक्तव्यावर शेट्टी यांनी जोरदार टीका केली.
ते म्हणाले, “लुंगी हा भारतातील कष्टकरी जनतेचा सन्मानाचा पोशाख आहे. संदीप देशपांडे आणि ठाकरे बंधूंनी या वक्तव्याने कष्टकरी जनतेचा अपमान केला आहे. त्यामुळे मुंबईकर जनता याच अपमानाचा बदला घेत ठाकरे बंधूंचीच पुंगी वाजवणार आहे.”
शेट्टी पुढे म्हणाले, शेकडो वर्षांपासून भारतात धोतर परिधान करण्याची परंपरा आहे. आग्नेय आशियातील सांस्कृतिक देवाणघेवाणीतून लुंगी भारतात आली. ती घालायला सोपी, आरामदायी असल्यामुळे उष्ण आणि दमट हवामान असलेल्या भागातील कष्टकरी वर्गात लोकप्रिय झाली. केरळ, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, कर्नाटक या राज्यांमध्ये लुंगीला वेष्टी, मुंडू, कैली तर पंजाब-हरियाणामध्ये तांबा, तेहमत, लाछ अशी वेगवेगळी नावे आहेत.
सारोंग म्हणून ओळखली जाणारी लुंगी इंडोनेशिया, बांगलादेश, पाकिस्तान, कंबोडिया, श्रीलंका, म्यानमार, ब्रुनेई, मलेशिया, नेपाळ, सिंगापूर, थायलंड, आफ्रिका आणि दक्षिण अरबी द्वीपकल्पातही मोठ्या प्रमाणावर वापरली जाते. इतकेच नव्हे तर इस्लामचे प्रेषित पैगंबर मोहम्मद सुद्धा सारोंग परिधान करत असत, असे सांगत शेट्टी यांनी ठाकरे बंधूंच्या नव्याने स्वीकारलेल्या हिरव्या राजकारणावर टोला लगावला.
“आता त्यांच्या हिरव्या राजकारणात ‘उठाव लुंगी, बजाव पुंगी’ बसते का? हा प्रश्न संदीप देशपांडे यांनी ठाकरे बंधूंनाच विचारावा,” असे ते म्हणाले.
तामिळनाडू भाजपचे नेते के. अण्णामलाई यांच्याबाबत बोलताना शेट्टी म्हणाले, “संदीप देशपांडे यांच्यासारख्या पक्ष भाड्याने देणाऱ्या लोकांनी अण्णामलाईंबद्दल बोलूच नये. अण्णामलाई यांनी तामिळनाडूत भाजपचा झंझावात उभा केला आहे, आणि इकडे संदीप देशपांडे यांचा पक्ष रोज भाड्याने दिला जातो,” असा टोला त्यांनी लगावला.
“एकूणच येणाऱ्या मुंबई महानगरपालिका निवडणुकीत मुंबईकर जनता ठाकरे बंधूंची पुंगी वाजवल्याशिवाय राहणार नाही,” असा इशारा निरंजन शेट्टी यांनी शेवटी दिला.

