X : @therajkaran
मुंबई: विधानसभेत आज मुंबईच्या विषयावरील चर्चेत कॉंग्रेस सदस्या वर्षा गायकवाड (Congress MLA Varsha Gaikwad) यांनी सहभागी होताना गेल्या दिड वर्षात मुंबईने फक्त मित्र काळ पाहिला, या काळात फक्त मित्रासाठी टेन्डर्स काढण्यात आली. मुंबई अक्षरशः विक्रीस काढली, लोकशाहीची हत्या आहे, मुंबईचा पैसा हा करदात्या नागरिकांचा आहे, तो त्यांच्यासाठीच खर्च व्हायला हवा, हे मुद्दे जोरदार आग्रहीपणे मांडले.
वर्षा गायकवाड यांच्या भाषणातील मुद्यांना वारंवार हरकतीचे मुद्दे उपस्थित करीत भाजप सदस्यांनी तीव्र आक्षेप घेतले. आधी एकाकीपणे पण ठाम शब्दात बाजू मांडण्याऱ्या वर्षा गायकवाड यांच्या बाजूने विरोधी बाकावरूनही महिला सदस्य उभ्या राहिल्या, काही काळ सभागृहात प्रचंड गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. मात्र आपण सत्य बोलत आहोत, म्हणूनच हे आक्षेप व हरकतीचे मुद्दे उपस्थित केले जात आहेत, अशी टोलेबाजी करीत वर्षा गायकवाड यांनी आपले भाषण पूर्ण केले. यावेळी सत्ताधारी सदस्यांच्या वारंवार मागणीवरून पिठासन अधिकाऱ्यांनी गायकवाड यांच्या भाषणात काही आक्षेपार्ह असल्यास ते वगळले जाईल असे स्पष्ट केले.
सत्ताधारी पक्षांनी नियम-२९३ द्वारे मुंबईचे प्रश्न व विकास या संदर्भात प्रस्ताव आणला होता. ज्येष्ठ भाजप सदस्य ॲड.आशीष शेलार यांनी या चर्चेला सुरुवात केली. विरोधी बाजूने वर्षा गायकवाड यांना संधी मिळताच त्यांनी आशीष शेलार यांचे मुद्दे खोडून काढीत अत्यंत आक्रमक सुरूवात केली. आजच्या आज मुंबई मनपा आयुक्तांची बदली करा, अशी त्यांनी मागणी केली. बजेटमध्ये एक हजार कोटी रुपये बाजूस ठेवले, ते सत्ताधारी आमदार आणि काही माजी नगरसेवकांसाठी आहेत, असा आरोप त्यांनी केला. मुंबईतील काही जमिनी, मोकळ्या जागा, डिप क्लिंनिग, खड्ड्यांची कामे, रस्ते, आमदारांनी विकसित केलेल्या बागा, क्रीडा संकुले, धारावीतील सात लाख लोकांचे स्थलांतर हे सर्व मित्रांचे भले करण्यासाठी सुरू आहे. डिप क्लिंनिग योजनेमुळे ७५ हजार कामगारांवर बेकारीची कु-हाड कोसळणार आहे, शिक्षणाचा जो नवा कायदा करता आहात, त्याचा पुनर्विचार करा, अशी जोरदार मागणी त्यांनी केली. केवळ मित्रांना काय काय देता येईल याच विचारातून सारे सुरू आहे. विरोधकांना बोलू द्यायचं नाही, हे योग्य नाही, असेही वर्षा गायकवाड म्हणाल्या.
आशीष शेलार, नितेश राणे, अमित साटम, योगेश सागर यांनी वारंवार हरकतीचे मुद्दे उपस्थित करीत वर्षा गायकवाड यांच्या भाषणातील आक्षेपार्ह विधाने काढा, अशी मागणी लावून धरली. पिठासीन अधिकारी दीपक चौहान यांनी जर काही आक्षेपार्ह वक्तव्य असेल तर तपासून काढून टाकू असे आश्वासन दिले.