मुंबई
भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी शिंदे गटाचे कल्याण शहरप्रमुख महेश गायकवाड यांच्यावर ६ गोळ्या झाडल्यानंतर राज्यभरात याचे पडसाद उमटले. महेश गायकवाड यांना ठाण्यातील ज्युपिटर रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्या शरीरातील सहा गोळ्या बाहेर काढण्यात डॉक्टरांना यश आलं आहे.
दरम्यान हिललाईन पोलीस स्टेशनमधील एक सीसीटीव्ही फुटेज समोर आलं आहे. यामध्ये एका खोलीत काही जणं खुर्चीत शांत बसलेले आहेत. यात गणपत गायकवाड आणि महेश गायकवाड आणि इतर साथीदारांचा समावेश आहे. अचानक गणपत गायकवाड हातात पिस्तूल घेऊन महेश गायकवाडांवर गोळ्या झाडताना दिसत आहे. गोळ्या झाडल्यानंतर ते थांबत नाहीत तर महेश गायकवाड याला मारहाणही करतात. गोळ्यांच्या आवाजाने पोलीस निरीक्षक धावत खोलीत येतात. ते गणपत गायकवाड यांना दूर लोटण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे, मात्र ते महेश गायकवाड याला सोडण्यास तयार नाही, असं व्हिडीओतून स्पष्ट दिसून येत आहे.
यापूर्वी गणपत गायकवाड यांनी पोलिसांना दिलेल्या जबाबात, महेश गायकवाडांनी त्यांच्या मुलावर हात उचलल्यानंतर बचाव करण्यासाठी आणि रागातून गोळ्या झाडल्याचं सांगितलं होतं. मात्र समोर आलेल्या सीसीटीव्हीमध्ये कुठेच वाद होत असल्याचं दिसत नाही. हे सीसीटीव्ही समोर आल्यानंतर मोठा पुरावा हाती लागला आहे. दुसरीकडे महेश गायकवाड यांची प्रकृती अद्याप गंभीर आहे. त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न करणारे भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्यावर काय कारवाई करणार हे येत्या काही दिवसात समोर येईल.