मुंबई : लोकसभा निवडणुकीचे (Loksabha Election )वारे वाहू लागल्यापासून गोकुळचे संचालक, थायलंडचे आर्थिक सल्लागार डॉ. चेतन नरके (Chetan Narake) यांनी कोल्हापूर लोकसभा मतदार संघातुनच निवडणूक लढवण्याचा निर्धार केला आहे.दोन दिवसांपूर्वी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray)आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut ) यांची डॉ. चेतन नरके यांनी भेट घेतली होती. या भेटीत नरके यांना हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून ठाकरे गटाकडून उमेदवारी घ्यावी, असा प्रस्ताव ठेवला होता. त्यानंतर नरके यांनीआज हा प्रस्ताव फेटाळत कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातूनच निवडणूक लढणार असल्याच ठाम मत व्यक्त केल आहे.
कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात काँग्रेसने श्रीमंत शाहू महाराज (Shahu Maharaj )यांना उमेदवारी दिली आणि हातकणंगले हा मतदारसंघ शिवसेनेसाठी सोडण्यात आला . या जागेवरून चेतन नरके यांनी निवडणूक लढवावी असा प्रस्ताव मातोश्री वरून देण्यात आला होता. पण नरके यांनी प्रस्ताव फेटाळला असून कोल्हापूरातूनच निवडणूक लढवण्याचा माझा निर्णय ठाम असल्याची भूमिका आज स्पष्ट केली आहे. ठाकरेंनी दिलेल्या प्रस्तावानंतर नरके म्हणाले, कोल्हापूरची जागा शिवसेनेला गेली असती तर माझी उमेदवारी नक्की होती. ती जागा काँग्रेसला गेली. मी अजून कोल्हापूरच्या रिंगणातून बाहेर पडलेलो नाही. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, खासदार संजय राऊत यांनी माझ्यावर विश्वास ठेवला. माझ्या कर्तृत्वावर विश्वास ठेवून त्यांनी हातकणंगलेचा पर्याय दिला. मात्र, खासदार राऊत यांच्याशी फोनवरून संपर्क करून दिलेल्या प्रस्तावाला मी नकार दिला असल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान, गेल्या तीन वर्षांपासून नरकेंनी कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात प्रचाराचा धडाका सुरू ठेवलेला आहे. ठाकरेंच्या प्रस्तावानंतर त्यांना पुन्हा हातकणंगलेतून नव्याने सुरुवात करावी लागणार. शिवाय प्रचारातून पाया मजबूत केला असताना हातकणंगलेतून निवडणुकीला उभे राहणे शक्य नसल्याचे डॉ. नरके यांनी स्पष्ट केलें आहे.