मुंबई
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा नेते मनोज जरांगे पाटलांना ओबीसींमधून आरक्षण आणि सगेसोयऱ्याची मागणी मान्य केल्यामुळे मराठा समाजाला दिलासा मिळाला असला तरी ओबीसी समाजाकडून राज्य सरकारवर टीका केली जात आहे. ओबीसी नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांनीही राज्य सरकारच्या निर्णयावर आक्षेप घेतला आहे.
मराठा आरक्षणाचा अध्यादेश काढल्यानंतर दुसऱ्याच दिवशी छगन भुजबळांनी पत्रकार परिषद घेत आपला विरोध व्यक्त केला आणि याविरोधात ओबीसी समाजाला एकत्र येण्याचं आवाहन केलं. एका वृत्तमाध्यमाला मुलाखत देताना, मुख्यमंत्र्यांनी मराठा आरक्षणाच्या अध्यादेशाबाबत मंत्रिमंडळात चर्चा केली नसल्याचा दावा भुजबळांनी केला आहे. त्यामुळे महायुतीत सर्वकाही आलबेलं नसल्याचं चित्र आहे.
आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना शिंदे गटाच्या दोन आमदारांनी छगन भुजबळ यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी, अशी मागणी केली आहे. शिवसेनेचे आमदार संजय गाडकवाड यांनी भुजबळांची मंत्रिमंडळातून थेट हकालपट्टी करावी अशी मागणी केली आहे. कशाला लाड करता, याला आधी बाहेर काढा, असं गायकवाड म्हणाले. त्यांच्या मागणीवर संजय शिरसाट यांनी प्रतिक्रिया देताना भुजबळांवर टीका केली आहे. आणि त्यांनीही भुजबळांना राजीनामा देण्याचा सल्ला दिला आहे.