मंत्री छगन भुजबळ यांची स्पष्टोक्ती….!
X :@NalavadeAnant
मुंबई: मी सत्तारूढ सरकारमध्ये एका जबाबदार खात्याचा मंत्री असल्याने ओबीसी मेळाव्यात बोलू शकत नव्हतो. या मेळाव्यात मी माझ्याच सरकार विरोधात माझी परखड भूमिका बोलून दाखवणार असल्याने म्हणजेच एक प्रकारे सरकार विरोधात बोलणार असल्याने मी त्यावेळी माझ्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता, अशी स्पष्टोक्ती अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी गुरूवारी प्रसार माध्यमांशी बोलताना दिली.
नाशिक येथे पूर्वनियोजित कार्यक्रमासाठी आलेल्या मंत्री छगन भुजबळ यांनी आपण राजीनामा दिला होता याचा पूनरूच्चार करीत, आपल्याच सरकारच्या निर्णयाविरोधात बोलताना जर आपण मंत्रीपदावर राहून विरोध केला असता तर विरोधकांनाही आयतीच संधी मिळली असती की, मंत्रिमंडळातही राहायचे व सरकारच्या विरोधातही बोलायचे, असे स्पष्टीकरणही त्यांनी यावेळी दिले.
भुजबळ म्हणाले, माझ्या पक्षाने तर सोडाच पण सरकार मधील कोणत्याच पक्षाने माझा राजीनामा मागितला नव्हता. पण माझ्या मनाला ते पटले नाही. कारण मी ज्या ओबीसी एल्गार सभेला जात होतो तिथे मला एक ओबीसी नेता म्हणून सरकारच्या विरोधात बोलावेच लागले असते, त्यामूळे हा राजीनाम्याचा खटाटोप केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असोत की उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, त्यांनी फक्त मी राजीनामा दिल्याची कबूली बाहेर कोणाकडेही देवू नका असे सांगितल्याने आपण पावणे तीन महिने कुठेच याची वाच्यता केली नव्हती, असा खुलासाही करण्यास मंत्री भुजबळ विसरले नाहीत.
माझ्या विरोधावरून विरोधकांनी प्रचंड टीका केली. मात्र मी गप्प बसणे पसंद केले. मात्र आमच्या सरकारमधील एका आमदाराने मुख्यमंत्र्यांना सल्ला दिला की, भुजबळला सत्तेतून लाथ मारून सरकार मधून बाहेर काढा. हे मला कळले, त्याचवेळी मला वाटले की जर आताच मी मंत्रिपदाचा राजीनामा दिला नाही तर माझ्याविरोधात जोरदार अपप्रचाराची मोहिम राबवली जाईल म्हणूनच मी स्वतःहून प्रसार जाहीर सभेत राजीनाम्याची कबूली दिली, असेही भुजबळ यांनी यावेळी ठासून सांगितले.
मात्र एक लक्षात घ्यावे की मंत्रिमंडळातून असो वा पक्षातून लाथ मारून बाहेर काढणारा आजपर्यंत कोणी झाला नाही आणि होणार नाही, असे खडे बोलही त्यांनी यावेळी सुनावले. त्याचवेळी मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण देण्यास माझा सुरुवातीपासून ठाम विरोध होता व तो कायमच असेल मग मी जिथं कुठं असेल तिथून ही विरोध करत राहिल, असा इशाराही भुजबळ यांनी दिला.