मुंबई
छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रवादी अजित पवार गटाच्यावतीने राज्यभरात दिनांक १२ ते १९ फेब्रुवारीपर्यंत ‘स्वराज्य सप्ताहाचे’ आयोजन करण्यात आले असून १२ फेब्रुवारी रोजी गेटवे ऑफ इंडिया मुंबई येथे राष्ट्रीय अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते शुभारंभ तर समारोप किल्ले रायगडाच्या पायथ्याशी पाचाड येथे होणार असल्याची माहिती राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी दिली.
महाराष्ट्राची अस्मिता आणि स्वाभिमान हा राष्ट्रवादी अजित पवार गटाचा मूलमंत्र आहे. त्यानुसार पक्षाकडून पदाधिकार्यांना, कार्यकर्त्यांना आणि फ्रंटल सेलला शिव विचारांचे विविध कार्यक्रम देण्यात आले असून राज्यभरात जिल्हा आणि तालुक्यासह गावपातळीवर आयोजन करण्यात आले आहे.
शिवकालीन आणि इतिहासाने प्रेरीत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या ऐतिहासिक स्थळाच्याठिकाणी ‘स्वराज्य ज्योत’ आणि ‘स्वराज्य पताका’ नेण्यात येणार आहे. या ज्योतीचे आणि पताकांचे गावागावात स्वागत करुन त्याठिकाणी शिवचरित्रावर आधारीत प्रबोधनात्मक कार्यक्रम घेतले जाणार आहेत.
‘स्वराज्य सप्ताहानिमित्ताने’ राज्यातील शिवप्रेरणा आणि छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आदर व स्वाभिमान युवक, युवती, महिला, विद्यार्थी आणि पदाधिकार्यांच्या मनात बिंबवला जाण्यासाठी राष्ट्रवादी अजित पवार गट तयारीला लागला आहे. शिवकालीन चरित्र, शिवकालीन संस्कृती आणि शिवकालीन मर्दानी खेळ शिवजयंतीच्यानिमित्ताने रायगडाच्या पायथ्याशी पाचाड येथे १९ फेब्रुवारी रोजी जागवले जाणार आहेत.
या सप्ताहात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने ज्या ऐतिहासिक वास्तू आणि गडकिल्ले पावन झाले आहेत त्याठिकाणी ‘रयतेचे मेळावे’ देखील आयोजित करण्यात आले आहेत. याशिवाय गडकिल्ले संवर्धन, स्वच्छता, पर्यावरण रक्षण आणि महिलांचा आदर यावरदेखील विविध कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले आहे तर कार्यक्रमाच्याठिकाणी ‘स्वराज्य शपथ’ ही घेतली जाणार असल्याचे सुनिल तटकरे यांनी सांगितले.
गेटवे ऑफ इंडिया येथील उद्घाटन कार्यक्रमाला राष्ट्रीय अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे आणि सर्व प्रमुख नेते याठिकाणी उपस्थित राहणार आहेत.