मुंबई : मुंबईच्या उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघाचे नवनियुक्त खासदार रवींद्र वायकर (MP Ravindra Waikar) यांना जोगेश्वरी भूखंड घोटाळा प्रकरणी मुंबई पोलिसांकडून क्लीन चीट देण्यात आली आहे. या प्रकरणी त्यांच्यावर असणारे सर्व गुन्हे मागे घेण्यात आले आहेत. त्यामुळे त्यांना आता दिलासा मिळाला आहे.
रवींद्र वायकर यांनी मुंबईतील जोगेश्वरी या भागात महापालिकेच्या जागेवर 500 कोटींच्या 5 स्टार हॉटेलचं बांधकाम केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला होता . त्यासाठी वायकर यांनी पालिकेकडून परवानगी देखील घेतली नव्हती. हा सुमारे 500 कोटी रुपयांचा घोटाळा असल्याचा दावा भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आरोप केला होता ,. याबाबत आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाकडे ही तक्रार करण्यात आली होती.या प्रकरणी रविंद्र वायकर यांची चौकशी सुरु होती. चौकशीसाठी हजर राहण्यासंदर्भात नोटीस देण्यात आली होती. मात्र वायकर या चौकशीला हजर राहिले नाहीत. त्यानंतर काही दिवसांपूर्वी ईडीकडून वायकर यांच्या घरावर धाड टाकण्यात आली होती. आता या सर्व प्रकरणानंतर आता त्यांना मुंबई पोलिसांकडून क्लीन चीट मिळाल्याची माहिती समोर आली आहे. तसेच गैरसमजातून हे सर्व गुन्हे दाखल केल्याचे मुंबई पोलिसांनी म्हणत त्यांच्यावरील सर्व गुन्हे मागे घेण्यात आले आहे.
वायकर यांच्या विरोधात मुंबई महापालिकेने दिलेली तक्रार अपूर्ण माहितीच्या आधारे दिली गेली होती . या प्रकरणात रवींद्र वायकर यांच्या पत्नी मनिषा आणि त्यांचे भागीदार आसू नेहलानी, राज लालचंदानी, प्रिथपाल बिंद्रा आणि आर्किटेक्ट अरुण दुबे यांच्या विरोधात फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला होता.दरम्यान आता या प्रकरणी त्यांच्यावर असणारे सर्व गुन्हे मागे घेण्यात आले आहेत . दरम्यान नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत मुंबई उत्तर-पश्चिम मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार रविंद्र वायकर अवघ्या 48 मतांनी विजयी झाले आहेत. वायकर यांनी शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार अमोल किर्तीकर (Amol Kirtikar) यांचा पराभव केला होता.
दरम्यान, या प्रकरणात मुंबई पोलिसांनी न्यायालयात क्लोजर रिपोर्ट सादर केला असला तरी, पोलिसांनी पालिकेवरच गैरसमजुतीतून गुन्हा दाखल केल्याचा ठपका ठेवल्यानं यावर आता पालिका नेमकी काय भूमिका घेते? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.