पुणे : युती सरकारने सादर केलेला अर्थसंकल्प हा राज्याच्या गंभीर आर्थिक संकटाला आणि निवडणुकीपूर्वी दिलेल्या आश्वासनांना तोंड न देणारा आहे, असा आरोप आम आदमी पार्टीचे राज्य प्रवक्ते मुकुंद किर्दत यांनी केला आहे.
“सरकारला ना आर्थिक पाहणी अहवालातील धक्कादायक निष्कर्षांची फिकीर, ना संकल्पपत्रातील आश्वासनांची जबाबदारी!” असे म्हणत त्यांनी या अर्थसंकल्पावर तीव्र टीका केली.
राज्याची अर्थव्यवस्था ढासळली, सरकार मात्र बेफिकीर आहे अशी टीका करताना श्री किर्दत म्हणतात, तीन दिवसांपूर्वी सादर झालेल्या आर्थिक पाहणी अहवालात राज्याच्या अर्थव्यवस्थेची बिकट स्थिती स्पष्ट झाली होती. राज्याचा कर्जाचा बोजा ७.८३ लाख कोटींवर गेला आहे. उद्योग आणि उत्पादन क्षेत्राचा वाढीचा दर मोठ्या प्रमाणावर घसरला आहे. दरडोई उत्पन्नाच्या बाबतीत महाराष्ट्र कर्नाटक, तामिळनाडू आणि गुजरातपेक्षाही मागे गेला आहे. गेल्या चार वर्षांत शासकीय रुग्णालये आणि शाळांची संख्या घटली आहे.
यावर ठोस उपाययोजना करण्याऐवजी सरकारने अहवालातील निष्कर्षांवर पूर्णपणे दुर्लक्ष केल्याचा आरोप किर्दत यांनी केला.
निवडणुकीतील गाजलेल्या आश्वासनांचे काय झाले? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. हा अर्थसंकल्प विधानसभा निवडणुकीनंतरचा पहिला असून, निवडणुकीदरम्यान भाजपने जाहीरनाम्यात मोठी आश्वासने दिली होती. मात्र या अर्थसंकल्पात त्या आश्वासनांसाठी कोणतीही भरीव तरतूद नाही, असा आरोप आम आदमी पक्षाने केला आहे.
महिला सक्षमीकरणासाठी २१०० रुपये भत्ता आणि २५,००० महिला पोलिस भरतीचे आश्वासन दिले होते, पण यासाठी निधी नाही. शेतकरी सन्मान योजनेत वाढीव मदतीसाठी कोणतीही तरतूद नाही.
२५ लाख रोजगार निर्मितीचे आणि १५ लाख कोटी गुंतवणुकीतून १४ लाख रोजगार निर्माण होईल, असे भासवले जात आहे. मात्र, उत्पादन क्षेत्र मागे पडले असताना एवढे रोजगार कसे निर्माण होणार, यावर कोणतीही ठोस योजना नाही.
वीजबिल ३०% कमी करण्याचे आश्वासन दिले होते. ‘हरीत ऊर्जा आणि नियोजन’ असे फक्त गोंडस कारण दिले, प्रत्यक्षात कोणताही स्पष्ट आराखडा नाही.
मोफत तांदूळ, ज्वारी, तेल, मीठ, साखर, मिरची पावडर देण्याचे आश्वासन दिले होते, पण रेशनधारकांची संख्या कमी करण्याचे धोरण राबवले जात आहे. उद्योजकांसाठी आकांक्षा केंद्राची घोषणा पण त्यासाठी कोणतीही तरतूद नाही. शाळांसाठी इंटरनेट आणि संगणक सुविधा देण्याची घोषणा पण याबाबतही कुठलाही ठोस निर्णय घेतलेला नाही.
मेट्रोसाठी कौतुक, पण ग्रामीण भागाकडे दुर्लक्ष केले असल्याचा आरोप करून आप नेते मुकुंद किर्दत म्हणतात, “शहरांसाठी मोठी वाहतूक प्रकल्प सुरू करताना ग्रामीण भागातील सार्वजनिक वाहतूक सुधारण्यासाठी काहीच तरतूद नाही, हे दुर्दैवी आहे.”
‘हा फसव्या आश्वासनांचा अर्थसंकल्प आहे अशी टीका त्यांनी केली आहे. “निवडणुकीपूर्वी मोठी स्वप्ने दाखवणाऱ्या सरकारने आता लोकांना त्यांच्या नशिबावर सोडले आहे. हा फक्त पळपुटा आणि दिशाभूल करणारा अर्थसंकल्प आहे,” अशी जोरदार टीका आम आदमी पक्षाने केली.