हर्षवर्धन सपकाळ यांची जाहीर भूमिका
मुंबई – स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये (Local Body Elections) काँग्रेस पक्ष सर्वाधिक जागा लढवण्यावर भर देणार असून ही सत्तेसाठी नव्हे तर विचारांसाठीची लढाई आहे, असे स्पष्ट विधान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ (MPCC President Harshwardhan Sapkal) यांनी केले. त्यांनी महायुतीतील (Mahayuti) कोणत्याही पक्षाशी आघाडी न करण्याचाही ठाम निर्णय व्यक्त केला. मात्र, त्यांच्या या भूमिकेमुळे मित्रपक्षांमध्ये असंतोष निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
सपकाळ यांच्या अध्यक्षतेखाली आज टिळक भवनात राज्य निवडणूक मंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली.
या बैठकीला विजय वडेट्टीवार, सतेज (बंटी) पाटील, नसीम खान, रजनी पाटील, नाना पटोले, चंद्रकांत हंडोरे, अमित देशमुख, विश्वजित कदम, माणिकराव ठाकरे, संध्या सव्वालाखे, शिवराज मोरे, सागर साळुंखे, आणि बी.एम. संदीप, मुजफ्फर हुसेन आदी वरिष्ठ नेते आणि निवड मंडळाचे सदस्य उपस्थित होते.
बैठकीनंतर बोलताना सपकाळ म्हणाले, “नगरपालिका निवडणुकांसाठी काँग्रेस (Congress) कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह आहे. प्रत्येक जिल्ह्यात संकल्प सभा आणि आढावा बैठका संपन्न होत आहेत. इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या गेल्या असून आता निर्णय अंतिम टप्प्यात आहेत. तिकीट वाटपात सत्तेचे विकेंद्रीकरण आणि पारदर्शकता राखली जाईल.”
पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना सपकाळ म्हणाले, “इंडिया आघाडीतील (I.N.D.I.A.) घटक पक्ष आणि इतर समविचारी संघटनांशी आघाडीबाबत चर्चा सुरू आहे. वामनराव चटप, राजू शेट्टी, आणि महादेव जानकर यांच्या संघटनांशी संवाद सुरू आहे, तर काही जिल्ह्यांत वंचित बहुजन आघाडीशी (Vanchit Bahujan Aghadi) आधीच युती झाली आहे. मात्र, मनसेकडून कोणताही प्रस्ताव आलेला नाही.” ते पुढे म्हणाले की, मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका अद्याप जाहीर झालेल्या नसल्याने आरक्षण जाहीर झाल्यानंतर आघाडी करायची की स्वबळावर लढायचे याचा निर्णय घेतला जाईल.
राज्यातील नगरपालिका व नगरपंचायत निवडणुकांसाठीची उमेदवारी प्रक्रिया अत्यंत किचकट असल्याची टीका सपकाळ यांनी केली. “२५ पानांचा अर्ज ऑनलाईन भरून ऑफलाईन सादर करावा लागतो. इंटरनेट आणि सर्व्हरच्या अडचणींमुळे उमेदवारांना त्रास होतो. विधानसभा (Assembly elections) आणि लोकसभा निवडणुकीप्रमाणे (Lok Sabha elections) अर्ज प्रक्रिया सोपी आणि ऑफलाईन भरण्याची मुभा द्यावी,” अशी मागणी काँग्रेसने निवडणूक आयोगाला केली आहे.
पार्थ पवार यांच्या कथित भूखंड घोटाळ्यावर (Land scam of Parth Pawar) भाष्य करताना सपकाळ म्हणाले, “पार्थ पवार यांच्यावर कोणतीही कारवाई होणार नाही. भाजप (BJP) महायुती सरकार बेशरम आहे. ‘ना खाऊंगा, ना खाने दूंगा’ म्हणत सत्तेवर आलेले आता ‘तुम भी खाओ, हम भी खाते हैं’ असा कारभार करत आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) हे ‘तो मी नव्हेच’ नाटकातील लखोबा लोखंडेची भूमिका करत आहेत.”
राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेवर टीका करताना सपकाळ म्हणाले, “भाजप महायुती सरकारमध्ये गुंडगिरीला राजाश्रय दिला जात आहे. तुळजापूर ड्रग प्रकरणातील आरोपीला भाजपात प्रवेश दिला गेला आहे. मटका, लँड आणि ड्रग माफियांना सरकार पाठीशी घालत आहे. सरकारमध्येच ‘गँगवॉर’ सुरू आहे. आमदार बाबा सिद्दीकी यांच्या हत्येच्या तपासात अडथळे निर्माण होणे हा सरकारचा पराभव आहे.”

