मुंबई
आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे. निवडणुकीची रणनीती ठरविण्यासाठी भाजपकडून बैठका घेतल्या जात आहेत. तर दुसरीकडे महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडीत वंचित बहुजन आघाडीचा समावेश करून घेण्याबाबत चर्चाच सुरू आहे. शरद पवारांनी भरसभेत खर्गेंना याबाबत विनंती केल्याचं म्हटलं असलं तरी अद्यापही खर्गेंनी वंचितला कोणताही निरोप पाठवला नसल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे आगामी निवडणूक वंचित एकहाती लढणार की आघाडीसोबत याचं गणित अद्याप सुटलेलं नाही.
जागा वाटपाचा तिढा..
वंचितचा महाविकास आघाडीत समावेश झाल्यानंतर प्रकाश आंबेडकर जास्त जागांची मागणी करू शकतात. याबाबत आधीच त्यांनी सर्वच जागा लढवण्याची तयारी व्यक्त केली आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे वंचितच्या एन्ट्रीनंतर जागा वाटपाचा तिढा अधिक क्लिष्ट होऊ शकतो. आधीच उद्धव ठाकरे गट, शरद पवार गट आणि काँग्रेसमध्ये जागा वाटपावरुन संघर्ष होण्याची शक्यता असताना वंचितच्या समावेशानंतर जागावाटपाचा तिढा अधिक वाढेल.
तो मेसेज किती खरा?
वचिंत बहुजन आघाडीने एक रिट्विट करून नाना पटोलेंसमोर सवाल उपस्थित केल आहे. यानुसार नाना पटोले यांनी नागपूरात ऑफ द रेकॉर्ड वंचितला महाविकास आघाडीत घेणार नसल्याचं म्हटलं आहे. या मेसेजचा दाखला देत वंचितने नाना पटोलेंना उत्तर देण्याची मागणी केली आहे. जर वंचितला महाविकास आणि इंडिया आघाडीत घेण्याची इच्छा नसेल तर खोटं का पसरवलं जात आहे, 2019 मध्येही असेच केल्याचा आरोप वंचितकडून केला जात आहे. मात्र अद्याप या मेसेजची पुष्टी झालेली नाही.
प्रकाश आंबेडकरांचा फॉर्म्युला
वंचित बहुजन विकास आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकरांनी महाविकास आघाडीकडे लोकसभा निवडणुकीसाठी 12 जागांची मागणी केली आहे. आता त्यांनी जागावाटपाबद्दल महाविकास आघाडीतील पक्षांना एक फॉर्म्युला दिला आहे. काँग्रेस, शरद पवारांची राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना यांनी प्रत्येकी 12 जागा लढवाव्यात. उर्वरित 12 जागा वंचित लढवेल, असा फॉर्म्युला आंबेडकरांनी सुचवला.