नागपूर
ठाकरेंशी केलेला वाद नागपूर प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे सचिव नरेंद्र जिचकर यांना महागात पडला आहे. प्रदेशाध्यश्र नाना पटोले यांनी शनिवारी जिचकरांना पक्षातून बाहेरचा रस्ता दाखवला आहे. सहा वर्षांसाठी काँग्रेसचं प्राथमिक सदस्यत्व रद्द करण्यात आलं आहे.
गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात प्रदेश काँग्रेसने नागपूर विभागाच्या संघटनेची बैठक बोलावली होती. ज्यात जिचकर आणि शहराध्यक्ष तथा आमदार विकास ठाकरे यांच्यात वाद झाला होता. यावेळी दोन्ही नेत्यांच्या समर्थक एकमेकांविरोधात भिडले होते. यावेळी मारहाणीचीही घटना झाली होती. या बैठकीस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले , विजय वडेट्टीवार, सुनील केदार यासह अनेक नेते उपस्थित होते. ज्येष्ठ नेत्यांच्या समोर आमदार ठाकरे आणि जिचकार यांच्यात वाद झाला होता.
यानंतर शिस्त पालन समितीचे अध्यक्ष पृथ्वीराज चव्हाण यांना तक्रार करून काँग्रेस कमिटीचे प्रदेश सचिव नरेंद्र जिचकार यांच्यावर कारवाईची मागणी करण्यात आली होती. जिचकार यांना कारणे दाखवा नोटीसही पक्षाकडून बजावण्यात आली होती. मात्र त्यांनी नोटीसीला समाधानकारक उत्तर न दिल्याने आज त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली.