१४ जानेवारीपासून काँग्रेसच्या भारत जोडो न्याय यात्राला सुरुवात होणार आहे. ही यात्रा १४ जानेवारी ते २० मार्चपर्यंत असणार असून राहुल गांधी या न्याय यात्रेचं नेतृत्व करतील. या यात्रेत ६७०० किलोमीटरहून अधिक प्रवास केला जाणार आहे. ६७ दिवस, ११० जिल्हे, १०० लोकसभा, ३३७ विधानसभेचा दौरा या भारत जोडो न्याय यात्रेच्या निमित्ताने केला जाणार आहे.
आज त्यांच्या भारत जोडो न्याय यात्राचं टीझर रिलिज झालं आहे. यामध्ये त्यांनी भाजपविरोधात मणिपूरसह असमानता, वाढती गरीबी, स्त्रियांची सुरक्षितता, रोजगार यांसारख्या अनेक मुद्द्यांचा उल्लेख केला आहे.
राहुल गांधी महाराष्ट्रातील सहा जिल्ह्यातून ४८० किलोमीटर प्रवास करणार आहेत. या न्याय यात्राची सांगता मुंबईत होणार आहे.
भारत जोडो न्याय यात्रा लोकसभेच्या निवडणुकीच्या तोंडावर आखण्यात आली असून काँग्रेसकडून याच यात्रेतून प्रचाराचा नारळ सुद्धा फोडला जाईल, यात शंका नाही. त्यामुळे राम मंदिर सोहळ्यातून भाजपचा प्रचार सुरु केला असतानाच काँग्रेसकडून प्रचाराचा शुभारंग केला जाईल. ही न्याय यात्रा उत्तर प्रदेशातील २० जिल्ह्यातून जाणार आहे. अयोध्येला मात्र थांबा नसेल, असं दिसतंय. उत्तर प्रदेशात यात्रा वाराणसी येथून प्रवेश करणार आहे त्यानंतर नंतर प्रयागराज, अमेठी, रायबरेली, लखनौ, बरेली, अलीगढ आणि आग्रा येथे जाईल.