मुंबई : शेतकऱ्यांच्या विविध समस्यांकडे दुर्लक्ष करणाऱ्या भाजपा युती सरकारच्या विरोधात काँग्रेसने आज राज्यभर आंदोलन केले. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या निर्देशानुसार विविध जिल्ह्यांमध्ये आंदोलन करून सरकारच्या शेतकरीविरोधी धोरणांचा निषेध करण्यात आला.
शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी, नियमित वीजपुरवठा, पीक विम्यावर जीएसटी रद्द करणे, ठिबक सिंचन अनुदान तातडीने देणे, सोयाबीन हमीभावातील फरक, सौर पंप आणि इतर कृषी अनुदाने तत्काळ मिळावीत, शेतमालाला हमीभाव आणि दूध दरवाढ मिळावी, या प्रमुख मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आले.
लातूरमध्ये खासदार डॉ. शिवाजी काळगे यांच्या उपस्थितीत तीव्र आंदोलन झाले. छत्रपती संभाजीनगर येथे खासदार डॉ. कल्याण काळे यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात आला. बुलढाण्यात माजी आमदार राहुल बोंद्रे यांच्या नेतृत्वाखाली हजारो शेतकरी व कार्यकर्ते सहभागी झाले.
धाराशिव येथे ट्रॅक्टर मोर्चा काढून सरकारचा निषेध करण्यात आला. चंद्रपूरमध्ये माजी आमदार सुभाष धोटे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन झाले. नांदेडमध्ये महानगरपालिकेतील समस्यांवर खासदार रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत आंदोलन झाले.
राज्यात अनेक जिल्ह्यांत काँग्रेसच्या शिष्टमंडळांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. उद्या, ४ मार्च रोजी महापालिका क्षेत्रातील समस्यांवर काँग्रेस आंदोलन करणार आहे.