Twitter : @NalavadeAnant
मुंबई
राज्यातील २ हजार ३२० ग्रामपंचायत निवडणुकीत काँग्रेस (Congress) पक्षाने आतापर्यंत ५८९ ग्रामपंचायतीवर विजयी झेंडा फडकवला आहे तर १३२ ग्रामपंचायतीत काँग्रेस विचारांच्या स्थानिक आघाडीने विजय मिळवत एकूण ७२१ ग्रामपंचायती (Gram Panchayat election results) जिंकल्या आहेत. एकंदरीत महाविकास आघाडीने एकूण १३१२ ग्रामपंचायतीत विजय मिळवत राज्यात आघाडी घेतली आहे, असा दावा करतानाच, भाजपने केलेले दावे साफ खोटे असून हिम्मत असेल तर भाजपने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घ्याव्यात असे आव्हान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (MPCC President Nana Patole) यांनी दिले.
पटोले म्हणाले की, ग्रामपंचायत निवडणुक निकालाबद्दल भाजपने (BJP) केलेला दावा हा खोटा व हास्यास्पद आहे. मुळात या निवडणुका चिन्हावर लढल्या जात नाहीत, त्यांनी दिलेले आकडे खोटे आहेत, त्यांनी ग्रामपंचायतींच्या नावासह यादी जाहीर करावी, मग कळेल, जनतेने कोणाच्या बाजूने निकाल दिला, असे आव्हानही त्यांनी दिले.
मागील वर्षी झालेल्या बाजार समिती निवडणुकीतही (APMC elections) भाजपाने असाच खोटा दावा केला होता. वस्तुस्थिती मात्र वेगळी आहे. राज्यातील बहुतांश बाजार समित्यांवर काँग्रेस व मित्र पक्षांचाच विजय झालेला आहे. ग्रामपंचायत निवडणुकीतही राज्यातील जनतेने भाजपाला त्यांची जागा दाखवून दिलेली आहे, पण ‘खोटे बोल पण रेटून बोल’ अशा पद्धतीने ते विजयाचा खोटा दावा करत आहेत, असा आरोपही पटोले यांनी केला.
ग्रामपंचायतीच्या या निवडणुकीत ओबीसी आरक्षण नव्हते. ओबीसी आरक्षणाशिवाय (OBC reservation) निवडणुका लढाव्या लागल्या, त्याला देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हेच जबाबदार आहेत. फडणवीस व भाजपामुळेच ओबीसींचे राजकीय आरक्षण गेले आहे. सत्तेवर आलो तर २४ तासात ओबीसी समाजाचे आरक्षण देण्याची वल्गना देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. पण दीड वर्षात यांनी ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण दिले नाही, याचे उत्तरही जनतेने भाजपाला दिले असून राज्यातील जनतेने भाजपाचा खोटारडा चेहरा उघडा पाडला आहे, अशी टीकाही त्यांनी यावेळी केली.
सर्वच भागात काँग्रेसचाच प्रभाव
अजित पवार (Ajit Pawar) महायुतीत आल्याने फायदा झाल्याच्या प्रश्नाला उत्तर देताना पटोले म्हणाले की, महायुतीला (Maha Yuti)जर फायदा झाला असेल तर मग विधानसभा बरखास्त करुन निवडणुका घेण्याची हिम्मत का दाखवत नाहीत. तिन तिघाडी आणि काम बिघाडी, अशी त्यांची अवस्था आहे. चिन्हावरील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका (Local body election) घेण्यास ते का घाबरता आहेत? अशी विचारणाही त्यांनी केली.