X: @therajkaran
मुंबई: केंद्रीय निवडणूक आयुक्त अरुण गोयल (Election Commissioner Arun Geol) यांनी तडकाफडकी राजीनामा दिल्याचे कारण आता समोर आले आहे. केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार (Chief Election Commissioner Rajiv Kumar) यांच्यासोबत पश्चिम बंगालमधील लोकसभा निवडणुकीच्या आढाव्यावरून तीव्र मतभेद झाल्याची माहिती समोर आली आहे. पश्चिम बंगाल दौरा अर्ध्यावर सोडून गोयल दिल्लीत परतले होते. त्यामुळे राजीव कुमार यांनी ५ मार्च रोजी एकटयाने पत्रकार परिषद घेतली. त्यानंतर चारच दिवसांनी, शनिवारी गोयल यांनी आपला राजीनामा थेट राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे पाठवला व तो त्याच दिवशी मंजूरही झाला. या वादात मध्यस्थी करण्याचे केंद्र सरकारचे प्रयत्न अपयशी ठरल्याचेही सांगितले जात आहे.
आगामी लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha Election) केंद्रीय निवडणूक आयोगाकडून तयारी सुरू असताना निवडणूक आयुक्त गोयल यांनी दिलेल्या राजीनाम्याने सर्वत्र आश्चर्य व्यक्त केले जात आहे. कारण गोयल यांचा कार्यकाळ हा ५ डिसेंबर २०२७ पर्यंत होता. विद्यमान मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार निवृत्त झाल्यानंतर अरुण गोयल हेच मुख्य निवडणूक आयुक्त होणार होते. मात्र त्यांनी आपला कार्यकाळ संपण्याआधीच राजीनामा दिला. या राजीनाम्यानंतर आता पुढे काय होणार? नव्या निवडणूक आयुक्तांची नेमणूक कधी आणि कशाप्रकारे केली जाणार? असे विचारले जात आहे. मात्र या तडकाफडकी दिलेल्या राजीनाम्याबाबत केंद्रीय निवडणूक आयोग, केंद्र सरकार व स्वत: गोयल यांनी संपूर्ण मौन बाळगले आहे.
गोयल यांच्या राजीनाम्यावरून काँग्रेससह अनेक विरोधी पक्षांनी केंद्र सरकार व भाजपवर निशाणा साधला आहे. गोयल यांचे मोदी सरकारशी मतभेद होते का? गोयल यांना भाजप लोकसभा निवडणुकीची उमेदवारी देणार आहे का? असे प्रश्न काँग्रेसचे माध्यम विभाग प्रमुख जयराम रमेश यांनी विचारले. पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, एमआयएमचे नेते असदुद्दीन ओवेसी, शिवसेना (उबाठा) खासदार संजय राऊत, तृणमूलचे साकेत गोखले टीकेची झोड उठविली आहे.