नवी दिल्ली
राज्याच्या आरोग्य विभागात लाखोंचा भ्रष्टाचार सुरू असल्याचा धक्कादायक आरोप शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी केला आहे. त्यांनी यासदंर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहिलं आहे.
दिल्लीत संजय राऊत यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी या भ्रष्टाचाराच्या आरोपाबाबत माहिती दिली. मी साडेतीन हजार पानांच्या पुराव्यासह आरोग्य विभागातील भ्रष्टाचाराचे पुरावे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पाठवला आहे, असे ते म्हणाले.
काय आहेत आरोप?
- नियमबाह्य बढत्या आणि बदल्या हा आरोग्य विभागातील एक मोठा विषय बनला असून या उद्योगाचे संचालक संबंधित खात्याचे मंत्री तानाजी सावंत असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला आहे.
- महाराष्ट्रातील एकूण १२०० वैद्यकीय अधिकाऱ्यांचे समावेशन करण्यासाठी प्रत्येकी चार लाख असे साधारण ५० कोटी रुपये जमा केले. हे संबंधित खात्याच्या मंत्र्यांपर्यंत पोहोचविण्यात आले. त्या वसुलीसाठी एक खास ओएसडीची नियुक्ती करण्यात आली.
- सध्या महात्मा ज्योतीराव फुले योजना लागू करण्यासाठी खासगी रुग्णालयांकडून एक बेडमागे एक लाख रुपये घेतले जातात. या योजनेत बोगस लाभार्थींची संख्या अधिक असून खोटी बिले, खोटे रुग्ण यावर कोट्यवधी रुपये मंत्र्यांच्या खिशात पोहोचवले जात आहेत.
- आरोग्य खात्याची दोन्ही संचालकपदे रिक्त ठेवली असून त्याचा लिलाव पद्धतीने सौदा करायचा मंत्र्यांचा प्लान आहे.
- ३४ पैकी १२ कनिष्ठ अधिकाऱ्यांच्या बेकायदेशीरपणे सिव्हील सर्जनपदी नियुक्ती केली, यात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याची शक्यता आहे.
- महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे १४ उपसंचालकांची निवड झाली, मात्र या नियुक्तीसाठी प्रत्येकाकडून ५० लाखांची मागणी केली.
- नाशिक, लातूर येथे राज्य लोकसेवा आयोगाचे उपसंचालक असताना ५० लाख रुपये घेऊन कनिष्ठ अधिकाऱ्यांना पदे दिली.