महाराष्ट्र राष्ट्रीय

तेलंगणातील पराभवामुळे ‘बीआरएस’ मराठवाड्यात बॅक फुटवर !

मराठवाड्याच्या शेजारी असलेल्या तेलंगणात (Telangana) दहा वर्षे सत्ता उपभोगणाऱ्या बी. आर. एस. ला स्वतःच्या राज्यात पराभव पत्करावा लागला. तेलंगणातील बी.आर. एस. च्या पराभवामुळे मराठवाड्यात (Marathawada) हा पक्ष आता बॅकफूटवर येणार आहे. मराठवाडा व विदर्भाच्या सीमेवर तेलंगणा हे राज्य आहे.

मराठवाड्याच्या पाऊलवाटेने बी आर एस (BRS) ने महाराष्ट्रात ‘अब की बार, किसान सरकार’ असा नारा देऊन राज्याच्या राजकारणात प्रवेश करणार असल्याचा इशारा दिला होता. तेलंगणात सत्तेची हॅट्रिक झाल्यास त्या ठिकाणी स्वतःच्या मुलाला मुख्यमंत्री करून केसीआर हे स्वतः लोकसभेची निवडणूक मराठवाड्यातील नांदेडमधून लढविणार अशी चर्चा बी आर एस पक्षातील दिग्गज नेतेमंडळी करत होती. त्यामुळे स्वतःच्याच राज्यात सत्ता गमावून बसलेल्या बीआरएसला आता महाराष्ट्रसह मराठवाड्याची दारे बंद करून घेण्याची वेळ आली आहे.‌

मराठवाड्यात बी आर एस ची सभा घेण्यासाठी ज्या तेलंगणातील आमदारांनी पुढाकार घेतला होता खुद्द त्यांनाच पराभवाला सामोरे जावे लागले. बी आर एस च्या मराठवाडा सीमेवरील तेलंगणातील आमदारांना पराभवाची धूळ चाखावी लागली आहे . त्या ठिकाणी काँग्रेस पक्षाला यश मिळाले.‌ बी आर एस चे संस्थापक अध्यक्ष के चंद्रशेखरराव (KCR) यांनी १० महिन्यांपूर्वी महाराष्ट्रात सभा घेऊन राज्यासह देशाच्या राजकारणात आपण आपली ताकद दाखवून देऊ , असा इशारा दिला होता.‌ के.सी.आर. यांच्या सभेमुळे मराठवाड्यातील इतर पक्षातील काही नेत्यांनी बी आर एस मध्ये प्रवेश घेतला होता.

बी आर एस मधील विविध प्रलोभनाला बळी पडून मराठवाड्यातील नेत्यांनी स्वतःच्या पक्षाला सोडचिठ्ठी देत नवीन पक्षात उडी घेतली होती. आता तेलंगणातच बी आर एस ची सत्ता गेल्यामुळे मराठवाड्यातून ज्या – ज्या नेत्यांनी बी आर एस मध्ये प्रवेश केला होता त्यांची मात्र आता नक्कीच राजकीय गोची होणार आहे. तेलंगणातील शेतकऱ्यांना केसीआर सरकारने विविध सोयी सवलती दिल्याचा गाजावाजा करून बी आर एस ने मराठवाड्यात तसेच विदर्भात सभा घेऊन स्वतःच्या पक्षाचा प्रचार मोठ्या प्रमाणात केला होता. त्यामुळे शेतकरी वर्ग देखील काही अंशी बीआरएस कडे वळला होता . परंतु आता बी आर एस ची सत्ता तेलंगणातून गेल्यामुळे या पक्षाचे मराठवाड्यातील तसेच विदर्भातील उरलेसुरले अस्तित्वही संपुष्टात आल्यात जमा आहे.

बीआरएसचे नेते केसीआर यांनी मराठवाडा व विदर्भात सभा घेतल्यानंतर भाजपाचे महाराष्ट्रातील नेते तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना ‘स्वतःचे राज्य सांभाळावे कारण त्यांची पुन्हा सत्ता येणार नाही’ असे भाकीत केले होते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेले भाकीत खरे ठरले असून यामुळे आता केसीआर यांना आत्मपरीक्षण करण्याची वेळ आली आहे. कुठलाही पक्ष सत्ता मिळविण्यासाठी सर्वात अगोदर शेतकऱ्यांच्या माध्यमातून राजकारणात प्रवेश करत असतो. बी आर एस ने देखील सत्ता मिळविण्यासाठी शेतकऱ्यांनाच हाताशी धरले होते . व त्याच जोरावर तेलंगणात बी आर एस ला दोन वेळेस सत्ता मिळाली. परंतु शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्यास बी आर एस कमी पडल्यामुळे त्यांना यावेळी सत्तेपासून दूर राहावे लागले.

आता तेथील शेतकऱ्यांनीच के सी आर यांचे डोळे उघडलेले असल्याने मराठवाडा व विदर्भातील बी आर एस कडे वळणारा शेतकरी वर्ग देखील आता यामुळे बी आर एस ची साथ सोडून गप्प बसणार हे मात्र नक्की आहे. तेलंगणात बी आर एस ची सत्ता जाण्यामागे तरुणांना दिलेले नोकरीचे आश्वासन पूर्ण न करणे तसेच शेतकऱ्यांना देऊ घालणाऱ्या विविध सवलती व योजनांमध्ये आलेले अपयश, हेच बीआरएसच्या पराभवाचे खरे कारण मानले जात आहे. राजकारणात कधी काय होईल, याचा नेम नसतो. नेमके तेच तेलंगणाच्या बाबतीत दिसून आले. तेलंगणात सत्ता गमावलेल्या बी आर एस चा महाराष्ट्रातील पुढील प्रवास आता खडतर मानला जात आहे. शेतकऱ्यांच्या जीवावर महाराष्ट्रात राज्य स्थापन करू पाहणाऱ्या बी आर एस ला खुद्द तेलंगणातील शेतकऱ्यांनी घरचा रस्ता दाखविला आहे. स्वतःच्या राज्यात आपली काय परिस्थिती आहे, याचे खरे गणित माहीत असताना देखील बीआरएसने तेलंगणा सोडून मराठवाडा व विदर्भात राजकारण का सुरू केले ? असा प्रश्न या निमित्ताने आता उपस्थित होत आहे.

Dr Abhaykumar Dandage

Dr Abhaykumar Dandage

About Author

डॉ अभयकुमार दांडगे (Dr Abhaykumar Dandage) हे नांदेड येथील ज्येष्ठ पत्रकार असून मराठवाडा हा त्यांचा लेखनाचा विषय आहे.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

राष्ट्रीय

स्वातंत्र्य दिन राजधानीत उत्साहात साजरा

Twitter : @therajkaran नवी दिल्ली 76 वा स्वातंत्र्य दिन राजधानी दिल्लीत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी उभय महाराष्ट्र सदनांमध्ये
राष्ट्रीय

लाल किल्ल्यावर फडकणारा तिरंगा कुठे तयार होतो?

Twitter : @therajkaran मुंबई राजधानी दिल्लीतील लाल किल्ल्यावर मोठ्या गौरवाने फडकणारा तिरंगा कुठे तयार केला जातो हे तुम्हाला माहिती आहे