नवी दिल्ली : आम आदमी पार्टीचे राष्ट्रीय संयोजक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आजही अंमलबजावणी संचालनालयासमोर हजर राहणार नाहीत, अशी माहिती समोर आली आहे. केजरीवालांना सातव्यांदा ईडीने समन्स पाठवलं होतं. हे प्रकरण अद्याप न्यायालयात प्रलंबित आहे. ज्याची सुनावणी 16 मार्च रोजी होणार आहे. दररोज समन्स पाठवण्याऐवजी न्यायालयाच्या निर्णयाची वाट पाहा. आम्ही इंडिया आघाडीसोबतची युती तोडणार नाही, असं आम आदमी पक्षाकडून सांगण्यात आलं आहे.
मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना २२ फेब्रुवारी रोजी अंमलबजावणी संचालनालयाने सातव्यांदा समन्स जारी करीत सोमवारी २६ फेब्रुवारी रोजी हजर होण्यास सांगितले होते. केजरीवालांना आतापर्यंत सात वेळा समन्स पाठवण्यात आलं आहे. मात्र अद्याप ते दिल्ली दारू घोटाळ्यातील मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयासमोर हजर राहिले नाही. यापूर्वी १४ फेब्रुवारी रोजी सहावं समन्स जारी करीत १९ फेब्रुवारी रोजी हजर होण्यास सांगितलं होतं. मात्र अद्याप ते प्रकरण कोर्टात सुरू असल्याने ईडीने कोर्टाच्या निर्णयाची प्रतीक्षा करावी, असं सांगण्यात आलं आहे.
१६ फेब्रुवारी रोजी कोर्टात हजर होणार केजरीवाल..
१७ फेब्रुवारी रोजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून न्यायालयात हजर राहिले होते. केजरीवालांनी दिल्ली विधानसभा बजेट सत्र संपताच मार्चमध्ये हजर राहण्याचं आश्वासन दिलं आहे. यानंतर न्यायालयाने आश्वासनाचा स्वीकार करीत १६ मार्च रोजी सुनावणीची तारीख निश्चित केली आहे.