बोरीवली : बोरीवलीतील पूर्व आणि पश्चिम भागात अनेक ठिकाणी बेकायदेशीर दारू दुकाने सुरू असून, या दुकानांजवळ तसेच उद्यानांमध्ये व रस्त्यावर मद्यपी धिंगाणा घालत असल्याच्या घटना वारंवार समोर येत आहेत. या मद्यपींमुळे महिला आणि तरुणींना त्रास सहन करावा लागत असून, त्यांच्यावर शेरेबाजी व छेडछाडीच्या घटना घडत असल्याने भाजपा बोरीवली महिला मोर्चाने या विरोधात पोलिसांकडे निवेदन दिले.
भाजपा बोरीवली महिला मोर्चाच्या अध्यक्षा सौ. रेश्मा निवळे यांच्या नेतृत्वाखाली, आमदार संजय उपाध्याय यांच्या मार्गदर्शनाखाली महिला मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी बोरीवली पोलीस ठाण्यात जाऊन डीसीपी भोईटे आणि चारकोप येथील वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीमती भोपळे यांना तातडीने कारवाई करण्याची मागणी केली.
महिला मोर्चाने स्पष्ट शब्दांत सांगितले की, जर बेकायदेशीर दारू विक्री आणि मद्यपींच्या त्रासावर आळा घालण्यात आला नाही, तर भाजपा महिला मोर्चाकडून तीव्र आंदोलन छेडले जाईल. या वेळी महिला मोर्चाच्या पदाधिकारी, महिला वार्ड अध्यक्षा आणि वार्ड पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.