उध्दव ठाकरेंच्या सहीचे विधानसभा अध्यक्षांना पत्र
मुंबई : पंधरावी विधानसभा अस्तित्वात आल्यापासून रिक्त असलेल्या विधानसभेच्या विरोधी पक्षनेते पदासाठी बरेच चर्वितचर्वण होवून अखेर उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेच्या वतीने विधिमंडळ पक्षाचे गटनेते भास्कर जाधव यांच्या नावाची शिफारस करण्यात आली आहे. यासंदर्भात मंगळवारी पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या सहीचे अधिकृत पत्रच विधानसभा अध्यक्ष अँड. राहुल नार्वेकर यांच्याकडे त्यांच्या नेत्यांनी सुपूर्द केले. आता या पत्रावर अँड. नार्वेकर यांच्याकडून लवकर निर्णय अपेक्षित असला तरी त्यांच्या नावावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व दोन्ही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार यांचे एकमत होईल का? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात विधानसभा निवडणूक होवून २४ नोव्हेंबरला पंधरावी विधानसभा अस्तित्वात आली. त्यानंतर झालेल्या विधानसभेच्या विशेष अधिवेशनात नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधी होऊन विधानसभा अध्यक्षांची निवड करण्यात आली. मात्र, विधानसभेच्या एकूण जागांपैकी १० टक्के म्हणजे २८ इतक्या जागा विरोधी बाकावरील कोणत्याही एका पक्षाला न मिळाल्याने विधानसभा विरोधी पक्षनेते पदाचा निर्णय प्रलंबित होता. विरोधी पक्षनेते पदासाठी संख्याबळाची अट नसल्याचे स्पष्टीकरण विधिमंडळ सचिवालयाकडून देण्यात आल्यानंतर ठाकरे गटाने विरोधी पक्षनेता निवडीसाठी प्रयत्न सुरु केले. कारण त्यांची सदस्य संख्या २० आहे.
मात्र, तत्पूर्वी विरोधी पक्षनेता ठरविण्याचे सर्वाधिकार शिवसेना ठाकरे पक्षाच्या आमदारांनी पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्याकडे एका बैठकीत सुपूर्द केले. त्यानंतर पक्षात प्रामुख्याने युवा नेते आ. आदित्य ठाकरे, मातोश्रीचे अत्यंत निकटवर्तीय आ. सुनील प्रभू, व शिवसेना ठाकरे गटाची मुलुखमैदानी तोफ अशी ओळख असलेल्या आ. भास्कर जाधव यांच्या नावावर बराच खल झाला. अशात खुद्द उध्दव ठाकरेंनी हे पद आपल्याला मिळावे यासाठी आघाडीचे नेते राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष खा. शरद पवार, यांच्यासह काँग्रेस व अन्य घटक पक्षांच्या नेत्यांशी विचारविमार्श केला. त्यानंतर आघाडीच्या नेत्यांनी शिवसेना उध्दव ठाकरे यांच्या गटाला विरोधी पक्षनेते पद देण्यावर शिक्कामोर्तब केले.
विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या मंगळवारी दुसऱ्या दिवशी शिवसेना ठाकरे गटाचे अध्यक्ष उध्दव ठाकरे विधानभवनात दाखल झाले. आल्या आल्या त्यांनी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या दालनात पुन्हा एकदा विधानसभेच्या आपल्या सर्व आमदारांचे अंतिम म्हणणे ऐकून घेतले. या बैठकीत उध्दव ठाकरे यांनी आ. भास्कर जाधव यांचे नाव सुचवले असता त्याला सर्वांनी एकमुखी पाठिंबा दिला. पाठिंबा मिळताच पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी विधानसभा अध्यक्ष अँड. राहुल नार्वेकर यांच्याकडे विरोधी पक्षनेते पदासाठी भास्कर जाधव यांची शिफारशींच्या सहीचे पत्र पाठवून दिले. आता असेही सांगण्यात येते की, एकदा अशाच एका अधिवेशनात याच भास्कर जाधव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नक्कल केली होती. तेंव्हापासून जाधव भाजप नेते व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या काळ्या यादीत गेले. त्यामूळे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या पचनी जाधवांचे नाव पडेल का हा खरा मुद्दा आहे. कारण उपमुख्यमंत्री अजित पवार व एकनाथ शिंदे यांच्या दोघांशीही जाधव यांचे बऱ्यापैकी सख्य आहे. त्यामुळे तिथून त्यांना काहीच अडचण येणार नाही.
विधिमंडळ कामकाजाचा प्रदीर्घ अनुभव
२०२४ च्या विधानसभा निवडणुकीत गुहागरमधून निवडून आलेल्या भास्कर जाधव यांना विधिमंडळ कामकाजाचा प्रदीर्घ अनुभव आहे. अभ्यासू आमदार अशी ओळख असलेल्या भास्कर जाधव यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात शिवसेनेतून केली होती. १९९५ मध्ये ते पहिल्यांदा चिपळूण मतदारसंघातून विधानसभेवर निवडून आले होते. त्यांनी अनेक उत्कृष्ट संसदपटू पुरस्कारानेही गौरविण्यात आले आहे. १९९५ आणि १९९९ असे सलग दोन वेळा निवडून आलेल्या जाधव यांना २००४ च्या निवडणुकीत पराभव पत्करावा लागला होता. २००९ मध्ये ते एकत्रित राष्ट्रवादी काँग्रेसमधून गुहागरमधून विजयी झाले होते. काँग्रेस आघाडी सरकारमध्ये त्यांनी राज्यमंत्री, मंत्री म्हणून काम केले. २०१९ च्या विधानसभा निवडणूक तोंडावर ते पुन्हा शिवसेनेत परतले. विरोधी बाकावर असताना त्यांनी पक्षाची बाजू जोरकसपणे मांडण्याचा प्रयत्न केला आहे.