मुंबई : राज्यातील वनविभागाच्या सीमेलगत असलेल्या गावांमध्ये शेतकऱ्यांना वाघांच्या हल्ल्यांचा धोका वाढला आहे. या हल्ल्यांमध्ये मृत्यू झाल्यास अपुरी नुकसानभरपाई, कठोर वनकायदे आणि वनअधिकाऱ्यांच्या कारवाईमुळे शेतकऱ्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. या समस्यांवर उपाययोजना शोधण्यासाठी संबंधित विभागीय मंत्री आणि वाघ-बिबट्यांचा वावर असलेल्या भागातील सर्व आमदारांची बैठक आपल्या दालनात आयोजित करण्याचे निर्देश विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिले.
विधानसभेतील लक्षवेधी सूचनेच्या वेळी विजय वडेट्टीवार आणि अन्य चार सदस्यांनी नियम 105 अंतर्गत हा मुद्दा उपस्थित केला. काँग्रेसचे आमदार नाना पटोले यांनी वन्यप्राण्यांच्या हल्ल्यांमध्ये मृत झालेल्या शेतकरी कुटुंबांना ₹40 लाख नुकसानभरपाई देण्याची मागणी केली. तसेच, कठोर वनकायद्यांमुळे शेती उद्ध्वस्त होत असून, शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत असल्याचे त्यांनी निदर्शनास आणले.
यावर उत्तर देताना वनमंत्री गणेश नाईक यांनी, “भूमीची उपलब्धता मर्यादित असताना लोकसंख्या आणि वन्यप्राणीसंख्या वाढत आहे. वन्यप्राण्यांचे नैसर्गिक खाद्य त्याच भागात उपलब्ध व्हावे, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. शाकाहारी प्राण्यांसाठी नैसर्गिक खाद्य पुरवण्यासाठी झाडे लावण्यात येतील,” असे सांगितले.
आमदार नाना पटोले यांच्या सर्व संबंधित अधिकाऱ्यांसह बैठकीच्या मागणीला वनमंत्री गणेश नाईक यांनी पाठिंबा दिला. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी या विषयाचे गांभीर्य ओळखून शुक्रवारी दुपारी ३ वाजता आपल्या दालनात बैठक बोलावण्याचे निर्देश दिले.