मुंबई: राज्यातील लाखो विद्यार्थी आणि कोट्यवधी नागरिकांसाठी दिलासा देणारा क्रांतिकारी निर्णय महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी बुधवारी जाहीर केला. यापुढे जात पडताळणी प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला, रहिवासी प्रमाणपत्र, नॉन-क्रिमिलेयर सर्टिफिकेट, राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र तसेच शासकीय कार्यालयात दाखल करावयाच्या सर्व प्रकारच्या प्रतिज्ञापत्रांसाठी आवश्यक असलेले ₹500 चे मुद्रांक शुल्क (स्टॅम्प ड्यूटी) माफ करण्यात आले आहे.
या निर्णयामुळे विशेषतः दहावी आणि बारावीच्या निकालानंतर महाविद्यालयीन प्रवेश प्रक्रियेत होणारा ₹3,000 ते ₹4,000 पर्यंतचा अतिरिक्त खर्च वाचणार आहे. याशिवाय अर्जदारांना यापुढे फक्त एका साध्या कागदावर स्वसाक्षांकित (Self Attested) अर्ज लिहून तहसील कार्यालयातून आवश्यक प्रमाणपत्र मिळू शकणार आहे.
महसूलमंत्री बावनकुळे यांनी या निर्णयाची तात्काळ अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे विशेषतः ग्रामीण भागातील नागरिकांना मोठा आर्थिक दिलासा मिळणार असून प्रमाणपत्रे मिळवण्याची प्रक्रिया सुलभ होणार आहे. सरकारच्या या निर्णयाचे सर्व स्तरातून स्वागत होत आहे.