सरकार साखळी कुंपणाबाबत सकारात्मक
मुंबई : राज्यात वाघांच्या संख्येत वाढ झाल्याने शहरी तसेच ग्रामीण भागांमध्ये, विशेषतः शेतीकाम करणाऱ्या नागरिकांवर हल्ल्यांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे नागरिकांचे जीवित व शेतीचे मोठे नुकसान होत आहे. या हल्ल्यांपासून बचावासाठी राज्य सरकारने सोलर फेन्सिंगसाठी ₹२०० कोटींचा निधी मंजूर केला आहे. तसेच, साखळी कुंपणासाठीही सरकार सकारात्मक असून त्यासंबंधी लवकरच पुढील निर्णय घेतला जाईल, असे वनमंत्री गणेश नाईक यांनी बुधवारी विधानसभेत लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना स्पष्ट केले.
भंडारा जिल्ह्यातील कोका वन्यजीव अभयारण्याच्या बफर झोनमधील एका गावात वाघाच्या हल्ल्यात एका महिलेचा मृत्यू झाला. या घटनेनंतर संतप्त ग्रामस्थांनी वन विभागाविरोधात आंदोलन छेडले. तसेच, बिबट्यांच्या हल्ल्यांमुळेही नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. यावर कायमस्वरूपी उपाय योजण्यासाठी संरक्षित जंगलांना साखळी कुंपणाने बंदिस्त करण्याची मागणी काँग्रेसचे विधिमंडळ गटनेते विजय वडेट्टीवार यांनी बुधवारी विधानसभेत केली.
वाघ आणि बिबट्यांच्या हल्ल्यांमुळे शेतकरी भयभीत असून शेतीकामात अडथळे निर्माण होत आहेत. त्यामुळे जंगलालगतच्या गावांची नोंद घेऊन सोलर किंवा साखळी कुंपण करण्याची तातडीची आवश्यकता असल्याचेही वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले.
यावर उत्तर देताना वनमंत्री नाईक यांनी २००० साली राज्यातील वाघांची संख्या १०१ होती, जी २०२५ पर्यंत ४४४ पर्यंत वाढल्याचे सांगितले. या वाढत्या संख्येमुळे हल्ल्यांवर नियंत्रण आणण्यासाठी सोलर फेन्सिंगसाठी ₹२०० कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. तसेच, साखळी कुंपणासाठीही सरकार सकारात्मक असल्याचे आश्वासन त्यांनी दिले.
वाढत्या हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी हस्तक्षेप करत येत्या शुक्रवारी संबंधित लोकप्रतिनिधींसोबत विशेष बैठक घेण्याचे निर्देश दिले. या बैठकीत वाघ आणि बिबट्यांपासून नागरिकांचे रक्षण करण्यासाठी पुढील उपाययोजना निश्चित केल्या जाणार आहेत.