Twitter : @NalavadeAnant
मुंबई
मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर राज्य सकारात्मकच आहे. मात्र, राज्यात मराठा आंदोलनाच्या असून हिंसाचार सुरु असल्याचा आरोप करत हिंसाचार करणाऱ्यांना सोडणार नाही, असा सणसणीत इशारा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना दिला.
मराठा आरक्षणाच्या संदर्भात जे आंदोलन सुरु आहे त्यासंदर्भात राज्य सरकार सकारात्मकतेने पाऊल उचलत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा आरक्षणाचे वचन दिले आहे. राज्य सरकार मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी कटिबद्ध आहे. मात्र याचवेळी काही लोक या आंदोलनाचा फायदा घेऊन हिंसा घडवण्याचा प्रयत्न करत आहेत, असा थेट आरोपही फडणवीस यांनी कोणाचे नाव न घेता केला.
ज्या प्रकारे बीडमध्ये लोकप्रतिनिधींची घरं जाळणे, विशिष्ट लोकांना लक्ष्य करणे, दवाखाने जाळणे ही कृती काही लोकांनी केली आहे ती चुकीचीच असून त्यावर कारवाई होणारच. मात्र जिथे शांततापूर्ण आंदोलन सुरु आहे तिथे कुठलीही कारवाई केली जाणार नाही. परंतु हिंसेला कुठेही थारा देणार नाही. या संदर्भात आवश्यकतेप्रमाणे अतिरिक्त कुमक मागवण्यात आली आहे. जोपर्यंत शांतता प्रस्थापित होत नाही तोपर्यंत पोलीस कारवाई करतील, असेही फडणवीस यांनी ठामपणे स्पष्ट केले.
काही राजकीय पक्षांचे नेते किंवा कार्यकर्ते देखील या हिंसाचारात सहभागी झाल्याचे दिसत आहे. त्यासंदर्भातले सगळे पुरावे मिळाल्यानंतर त्याचीही माहिती तुम्हाला दिली जाईल. काही लोक जाणीवपूर्वक हिंसाचार पसरवण्याचा प्रयत्न करत आहेत. अशा लोकांवर आम्ही कारवाई करणारच आहोत. काही लोक फेसबुक किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून धमकी देत आहेत त्यांच्यावरही कारवाई करण्यात येणार असल्याचे फडणवीस यांनी यावेळी नमूद केले.