Twitter : @NalavadeAnant
मुंबई
उध्दव ठाकरे यांना मराठा आरक्षणावर बोलण्याचा काडीमात्र नैतिक अधिकार ठाकरे नाही. कारण मराठा समाजाबद्दल त्यांना किती संवेदना आहेत ते मराठा समाजाला देखील माहीत आहे आणि आम्हाला देखील माहीत आहेत, अशा संतप्त शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी मंत्रालयात पत्रकारांशी बोलताना थेट उध्दव ठाकरेंवर प्रहार केला. त्यावेळी यांनी मराठा आरक्षणाच्या लढ्यात इंपेरिकल डेटा वेळेत सादर करण्यात दिरंगाई केल्यामुळेच मराठा आरक्षण गेले, त्यामुळे मराठा आरक्षणाचे खरे मारेकरी हे उद्धव ठाकरेच आहेत, असा घणाघाती हल्लाही मुख्यमंत्री शिंदे यांनी केला.
मराठा आरक्षणाचा विषय राज्यभर पेटलेला असताना आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हे आंदोलन शांत करण्यासाठी काही महत्वाचे निर्णय घेतले गेले. यात प्रामुख्याने मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्रांचे त्वरित वाटप सुरू करण्यासह इंपेरिकल डेटा जमा करण्यासाठी तीन माजी न्यायाधीशांची एकत्रित समिती स्थापन करण्याचा निर्णयाचा समावेश होता.
त्याचवेळी उद्धव ठाकरे यांनी मातोश्री निवासस्थानी पत्रकार परिषद घेऊन राज्यातील केंद्रीय मंत्र्यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्यावर राजीनामे देण्याची मागणी केली. यासंदर्भात विचारले असता, मुख्यमंत्री शिंदे यांनी त्यांना परखड शब्दात जोरदार प्रत्युत्तर दिले. ज्या काळात देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते, तेव्हा मराठा समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर त्याला उच्च न्यायालयात आव्हानही देण्यात आलं. तिथेही आम्ही ते टिकवले. पण हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेले तेव्हा मुख्यमंत्री कोण होते..? उपसमितीचे अध्यक्ष कोण होते..? त्यांनी हे आरक्षण टिकवण्यासाठी नक्की काय केलं..? त्यामुळे मराठा आरक्षणाचे खरे मारेकरी हे तुम्ही आहात, असे सांगत मुख्यमंत्री शिंदे यांनी उध्दव ठाकरेंवर थेट आरोपही केला.
राज्यात अत्यंत शांततेत मराठा मोर्चे काढले जात असताना या मोर्चांना ‘मुका मोर्चा’ असे संबोधून माता भगिनींचा अपमान करणारे नक्की कोण होते? हेदेखील सकल मराठा समाजाला माहीत आहे. त्यामुळे मराठा समाजाचे आरक्षण घालवणारे तुम्हीच आहात. उलट आम्ही आता सर्वोच्च न्यायालयात क्युरेटिव्ह पिटीशन दाखल केलेली आहे. मराठा समाजाचे मागासलेपण सिद्ध करण्यासाठी तीन निवृत्त न्यायाधिशांची समितीही नेमली असून त्यांना युद्धपातळीवर इंपेरिकल डेटा मिळवण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे तुमच्या वेळी जेव्हा हा डेटा मागवण्यात आला तेव्हा तो देण्यात तुम्ही दिरंगाई केलीत. मग आता मराठा आरक्षणाच्या मुद्यावर तरुणांच्या भावना भडकवून त्यांची दिशाभूल करण्याचा कोणताही नैतिक अधिकार तुम्हाला नाही, अशा कडक शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उध्दव ठाकरे यांची चांगलीच कानउघडणीही केली.