Twitter : @therajkaran
मुंबई
गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात पूर्वी नक्षलवादाचे वर्चस्व होते. नक्षल्यांच्या हल्ल्यात राज्याचे असंख्य पोलिस शहिद झाले आहेत. आज या जिल्ह्यात नक्षलवादाचा धोका (Threat of naxalism) कमी झालेला असला तरी तो पूर्ण संपलेला नाही. म्हणूनच गडचिरोली जिल्ह्यातील छत्तीसगडच्या सीमेवर असलेल्या पिपली बुरगी कोठी कोरनार या ठिकाणी पोहोचलेले राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Home Minister Devendra Fadnavis) यांचे कौतुक करावेसे वाटते.
गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्रीपद घेण्याचे धैर्य यापूर्वी तत्कालीन गृहमंत्री दिवंगत आर आर पाटील (R R Patil) यांनी दाखवले होते. आर आर पाटील यांनी या नक्षलग्रस्त भागांमध्ये रस्ते बांधणे, पूल बांधणे, पोलीस चौकी बांधणे यासारखी असंख्य विकासाची कामे केली. त्यामुळे नक्षलवादांच्या सहानुभूतीदारांची संख्या कमी होण्यात मदत झाली होती. तरीही आबांच्या काळात नक्षलवाद्यांनी भूसुरंगस्फोट घडून असंख्य पोलिसांचे बळी घेतले.
विकास कामाला विरोध हाच नक्षलवाद्यांचा प्रमुख अजेंडा होता. यानंतर एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनीही गडचिरोलीची (Gadchiroli) जबाबदारी घेऊन या नक्षल भागामध्ये अनेकदा भेटी देऊन पोलिसांचे आणि स्थानिकांचे मनोधैर्य वाढवण्याचा प्रयत्न केला होता. आता विद्यमान गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गेल्या वर्षभरात अनेकदा या नक्षलग्रस्त भागाला भेट देऊन जनता आणि पोलिसांमध्ये एक विश्वास निर्माण केला आहे.
फडणवीस यांनी आजच्या दौऱ्यात अत्यंत दुर्गम भागात असलेल्या पिपली बुरगी कोठी कोरनार या पुलाचे उद्घाटन केले. महाराष्ट्र आणि छत्तीसगडला जोडणारा हा महत्त्वाचा पूल (the bridge connecting Maharashtra and Chhattisgarh) आहे. पावसाळ्यामध्ये सुमारे 16 गावांचा पूर्णपणे संपर्क तुटत होता. आता येथील ग्रामस्थ पावसाळ्यातही राज्याच्या आणि प्रशासनाच्या संपर्कात राहतील. अत्यंत संवेदनशील भागात जाणारे देवेंद्र फडणवीस हे राज्याचे पहिले गृहमंत्री ठरले आहेत.
फडणवीस यांनी आज सुरजागड येथे पोलीस बॅरक प्रशासकीय इमारतीचे उद्घाटन केले. लाभार्थ्यांशी संवाद साधला. तेथून अहेरीपर्यंत प्रवास करत पोलीस कॅन्टीन, पोलीस लायब्ररी, पोलीस गार्डनचे उद्घाटन केले. एक गाव एक वाचनालय या अंतर्गत पोलीस संकुल, अहेरी येथे वाचनालय सुरू करण्यात आले आहे, त्याचे उद्घाटन फडणवीस यांनी केले. त्यांच्याच हस्ते शालेय मुलींना सायकलचे देखील वाटप करण्यात आले. नक्षलविरोधी अभियानात अतुलनीय कामगिरी करणाऱ्या व शौर्य पुरस्कार प्राप्त पोलीस अधिकारी आणि जवानांना गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रशस्तीपत्रक देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.
कालच गडचिरोली पोलीस दलातील 33 पोलिसांना शौर्य पुरस्कार जाहीर झाले होते. त्यांचाही सत्कार फडणवीस यांनी केला. प्राणहिता येथे चार नवीन बोलेरो गाडी आणि वीस दुचाकी वाहने नव्याने पोलीस दलाला देण्यात आली. तर अहेरी येथे पाच मोबाईल टॉवरचे उद्घाटन देखील फडणवीस यांनी केले.