मुंबई – “खोटेपणा हे काँग्रेसचे वैशिष्ट्य आहे आणि काँग्रेस प्रवक्ते नेमके तेच करत आहेत,” असा जोरदार हल्लाबोल भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी केला आहे. काँग्रेसने कोरटकरच्या अटकेवरून मुख्यमंत्री कार्यालयावर आरोप केले असले तरी, प्रतिक पडवेकर नावाचा कोणताही व्यक्ती मुख्यमंत्री कार्यालयात कधीच नव्हता, असे त्यांनी स्पष्ट केले.
“ना २०१४ ते २०१९ मुख्यमंत्रीपदाच्या काळात, ना २०१९ ते २०२२ विरोधी पक्षनेतेपदाच्या काळात, ना २०२२ ते २०२४ उपमुख्यमंत्रीपदाच्या काळात आणि ना २०२४ पासूनच्या मुख्यमंत्री पदाच्या काळात—प्रतिक पडवेकर नावाचा कोणीही मुख्यमंत्री कार्यालयात नव्हता. त्यामुळे काँग्रेसने खोटे आरोप थांबवावे आणि प्रशांत कोरटकर तेलंगणात काँग्रेस सरकारच्या आश्रयाला गेला होता का, याचे उत्तर द्यावे,” असे उपाध्ये म्हणाले.
ते पुढे म्हणाले, “कोरटकर नक्की कोणत्या काँग्रेस कार्यकर्त्याच्या घरात लपला होता? काँग्रेसने या प्रश्नाचे उत्तर द्यावे. खोट्या गोष्टी पसरवून मुख्यमंत्री कार्यालयावर आरोप करण्याऐवजी सत्य बाहेर आणावे.”
भाजप प्रवक्त्यांच्या या टीकेमुळे काँग्रेस-भाजप संघर्ष अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे.