X : @NalawadeAnant
मुंबई – काँग्रेस पक्षाच्या कामगिरीवर मागील काही दिवसात टीका केली जात होती. मात्र लोकसभा निवडणुकीत काँग्रेस व महाविकास आघाडीला चांगले यश मिळालेले असले तरी पुढील लढाई सोपी नाही. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत (assembly election) विजयासाठी मेहनत करावी लागणार आहे, लोकसभा (Lok Sabha election) जिंकलो म्हणून गाफील राहू नका, असा इशारा देतानाच विधानसभा निवडणूक जिंकण्यासाठी आजपासूनच कामाला लागा, असे आवाहन काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला (Congress party in charge Ramesh Chennithala) यांनी शुक्रवारी येथे केले.
महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या आढावा बैठकीत चेन्नीथला म्हणाले की, काँग्रेस संघटना मजबूत करण्यासाठी युवक काँग्रेसचीही भूमिका महत्वाची आहे. काँग्रेसची परंपरा घेऊन वाटचाल करा, निवडणुकीत युवक काँग्रेसवर मोठी जबाबदारी असते, त्यामुळे घरोघरी जाऊन प्रचार करणे, मतदाराला मतदान केंद्रावर आणणे यासह पक्षाची सर्व कामे युवक काँग्रेसला करायची आहेत. विधानसभा निवडणुकीला ९० दिवस बाकी आहेत. या ९० दिवसात सरकार बदलण्यासाठी सर्व पातळीवर काम करण्याची गरज आहे. राज्यातील सहा विभागात बैठका घेऊन कार्यक्रमांची आखणी करा व प्रत्येक बुथपर्यंत पक्षाचा विचार पोहचवा. विभाग, जिल्हा, ब्लॉक, पंचायत किंवा बुथ लेवलवर बैठका घ्या. जनता महाविकास आघाडीबरोबरच (Maha Vikas Aghadi) असून राज्यात परिवर्तन व्हावे, अशी जनतेची भावना आहे. परंतु संघर्ष केल्याशिवाय विजय मिळणे सोपे नाही, असाही इशारा चेन्नीथला यांनी दिला.
विरोधी पक्ष नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी देशभरातून दोन पदयात्रा काढल्या, त्याचा लोकसभा निवडणुकीत चांगला परिणाम दिसून आला. राहुल गांधी जनतेचे दुःख जाणून घेतात आणि जनतेचाही त्यांच्यावर विश्वास वाढलेला आहे. आज देशभरात नरेंद्र मोदींची (Narendra Modi) लोकप्रियता घटत चाललेली असून राहुल गांधी यांच्या लोकप्रियतेत दररोज वाढ होत आहे. ज्यांच्यामध्ये विजयी होण्याची क्षमता आहे त्याला उमेदवारी देण्याचा विचार पक्ष करेल. काँग्रेस पक्षात नवीन चेहऱ्यांना नेहमीच संधी दिली जाते. महाराष्ट्र (Maharashtra), झारखंड व हरियाणा या राज्यातील विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाला मोठा विजय मिळावा यासाठी काम करा. या तीन राज्यात काँग्रेसचा झेंडा फडकला तर दिल्लीतील मोदींचे सिंहासन डळमळीत होईल, असा विश्वासही रमेश चेन्नीथला यांनी व्यक्त केला.