महाराष्ट्र ताज्या बातम्या

राज्याची कुचकामी आरोग्य व्यवस्था बळकट करण्यासाठी डॉ. दीपक सावंत यांनी पुढाकार घ्यावा – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई : राज्याचे माजी आरोग्य मंत्री आणि कुपोषण टास्क फोर्सचे अध्यक्ष डॉ. दीपक सावंत यांनी त्यांच्या प्रदीर्घ अनुभवाचा उपयोग करून राज्याच्या आरोग्य व्यवस्थेच्या बळकटीकरणासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. “राज्याची आरोग्य व्यवस्था सक्षम करण्यासाठी तुमच्या ज्ञानाचा उपयोग राज्याला व देशाला होईल,” असे त्यांनी स्पष्ट केले.

डॉ. दीपक सावंत यांना ‘सोशियो-पॉलिटिकल इम्पॅक्ट ऑफ कोविड-१९ विथ रिस्पेक्ट टू महाराष्ट्र’ या विषयावरील संशोधन प्रबंधासाठी छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ, कोल्हापूर यांच्यातर्फे दुसरी डॉक्टरेट (पीएच.डी.) प्रदान करण्यात आली. यानिमित्त यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे आयोजित विशेष सत्कार सोहळ्यात उपमुख्यमंत्री शिंदे, नागपूरचे डॉ. पिनाक दंदे, डॉ. दीपक नामजोशी, डॉ. स्वप्नेश सावंत आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

या वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ऑनलाईन सहभागी झाले आणि डॉ. सावंत यांच्या कार्याचा गौरव केला.

डॉ. सावंत यांच्या कार्याचा उल्लेख करताना उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले, “डॉ. दीपक सावंत हे केवळ अभ्यासू नेते नाहीत, तर धडाडीचे डॉक्टर आणि कणखर प्रशासक आहेत. कोविड काळात त्यांनी रस्त्यावर उतरून गरजूंना मदत केली. मोखाडा, मेळघाट, नंदुरबार, पालघरसारख्या कुपोषणग्रस्त भागात त्यांनी मोठे योगदान दिले. अशा डॉक्टरांना कधीही निवृत्ती मिळत नाही. तुम्ही राजकीय चिंता करू नका, तुमचे आरोग्यदायी दीपक सदैव तेवत राहो,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

डॉ. सावंत यांनी एपिडेमिक अॅक्ट, डिझास्टर मॅनेजमेंट अॅक्ट, इंटरनॅशनल हेल्थ रेग्युलेशन, सिव्हिल एव्हिएशन इंटरनॅशनल अॅक्ट यामधील त्रुटींवर संशोधन करून सरकारला धोरणात्मक सुधारणा सुचवल्या आहेत. या प्रबंधाला संयुक्त राष्ट्रसंघ (UNO) स्तरावर घेऊन जाण्याची मागणी त्यांनी यावेळी उपमुख्यमंत्र्यांकडे केली.

कोविड काळातील योगदान आणि नियोजन
• २५ जानेवारी २०२० रोजी पहिली बैठक घेऊन “कोविडचा प्रभाव मोठा असेल” असे त्यांनी भाकीत केले.
• झोपडपट्ट्यांपासून ते उच्चभ्रू वसाहतींपर्यंत कोविडचा प्रादुर्भाव होईल, याबाबत इशारा दिला.
• सेव्हन हिल्स हॉस्पिटल आणि अनेक रुग्णालयांना कोविड यंत्रणा उभारण्यासाठी मार्गदर्शन केले.
• ‘मळम करोनाचे’ हे पुस्तक प्रसिद्ध करून कोविड काळातील धोरणात्मक चुका आणि बदलण्याजोगे नियम यावर भाष्य केले.

डॉ. सावंत यांनी आपल्या भाषणात सांगितले, “माझे आदर्श डॉ. श्रीकांत जिचकार होते. त्यांच्या तुलनेत मी एक डिग्री कमी आहे.”

छत्रपती शिवाजी विद्यापीठाचे मार्गदर्शक डॉ. प्रकाश पवार यांनी सांगितले की, “डॉ. सावंत यांना पीएच.डी. करताना अनेक अडचणी आल्या, पण जिद्दीने त्यांनी पूर्ण केली. त्यांच्या संशोधनातून राज्याच्या आरोग्य व्यवस्थेला दिशा मिळेल.”

या सोहळ्यात राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक, शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे, आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर, गृहराज्यमंत्री योगेश कदम, डॉ. प्रकाश पवार तसेच डॉ. सावंत यांचे हितचिंतक आणि मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Avatar

Rajkaran Bureau

About Author

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात