लेख महाराष्ट्र

नंदुरबार जिल्हा निर्मितीचा रौप्य महोत्सव.. अन जिल्हा निर्मितीचे शिल्पकार डॉ. विजयकुमार गावित

X : @KhandurahG

सातपुडा पर्वत रांगांवर गुजरात आणि मध्यप्रदेश सीमेलगत असलेल्या आदिवासी बहुल नंदुरबार जिल्ह्याची निर्मिती दि. 1 जुलै 1998 रोजी झाली. आज या जिल्हा निर्मितीला पंचवीस वर्ष पूर्ण झाली आहेत. या जिल्हा निर्मितीमागे राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांचा सिंहाचा वाटा आहे. त्यांनी याकरिता आपली संपूर्ण राजकीय शक्ती पणाला लावली होती, हे नाकारुन चालणार नाही. म्हणून जेव्हा -जेव्हा नंदुरबार जिल्ह्याचा इतिहास लिहिला जाईल, त्या इतिहासाच्या सोनेरी पानांवर डॉ. विजयकुमार गावित यांचे नाव कोरले जाईल.

नंदुरबार, नवापूर, तळोदा, शहादा, अक्कलकुवा आणि अक्राणी (धडगाव) या सहा तालुक्यांचा समावेश असलेला हा भूभाग पूर्वी धुळे (Dhule) जिल्ह्यात होता. सातपुड्याच्या (Satpuda Hills) कुशीत डोंगर -टेकड्यांनी व्यापलेल्या आणि आदिवासी समाज (Tribal) मोठ्या संख्येने असलेल्या या जिल्ह्याला इतिहास आहे. येथील आदिवासी लोकजीवनाची एक स्वतंत्र  शैली आहे. रूढी, प्रथा, परंपरा आहे. आगळीवेगळी लोकसंस्कृती आहे.

पश्चिम खान्देश (धुळे -नंदुरबार ) क्षेत्रातील तापी नदीच्या (Tapti River Basin) खोऱ्याचा भाग सोडला तर हा भाग डोंगराळ आणि घनदाट जंगलांचा आहे. सातपुड्याच्या आणि सह्यादीच्या (Sahyadri) विस्तीर्ण टेकड्यांनी व्यापलेल्या या जिल्ह्यातील प्रमुख शहर असलेले नंदुरबार (Nandurbar) हे मात्र तुलनेनं सपाटीवर आहे. तरी भोवताली छोट्या – छोट्या टेकड्या आहेत. याच शहराचे प्रतिनिधित्व डॉ. विजयकुमार गावित (Dr Vijaykumar Gavit) हे 1995 पासून करीत आहेत.

आपला वैद्यकीय पेशा सोडून डॉ. विजयकुमार गावित हे राजकीय पटलावर आले ते 1995 साली. त्यांनी आपली पहिली निवडणूक नंदुरबार विधानसभा मतदार संघातून अपक्ष उमेदवार म्हणून लढविली. ते भरघोस मतांनी विजयी झाले. अन तेथूनच त्यांचा राजकीय ‘विजयी’रथ जो वेगवान पद्धतीने दौडू लागला, त्याने मागे वळून पाहिलेच नाही. तेव्हापासून आजतागायत त्यांची वाटचाल अव्याहतपणे सुरुच आहे.

त्याच दरम्यान राज्यात शिवसेना भाजप युतीचे सरकार आले.  मनोहर जोशी (Manohar Joshi) आणि गोपीनाथ मुंडे (Gopinath Munde) यांच्यावर शिवशाही सरकार (Shivshahi government) सांभाळण्याची जबाबदारी  होती. तेव्हा निवडून आलेल्या अपक्ष आमदारांची संख्या 45 पेक्षा अधिक होती. त्यामुळे त्यांच्या  पाठींब्याशिवाय सरकार स्थापन होवू शकत नव्हते. त्यावेळी अपक्ष आमदार म्हणून डॉ. विजयकुमार गावित यांनी सरकारला जाहीर पाठींबा दिला. परंतु तेव्हा त्यांचे नशिब एवढे जोरात निघाले की, पहिल्याच कार्यकाळात त्यांना राज्यमंत्री पदाची लॉटरी लागली. सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण, वैद्यकीय शिक्षण, औषधी द्रव्ये या जनतेशी निगडीत आणि त्यांच्या आवडीच्या व्यवसायासंबंधित खात्याचा पदभार त्यांना मिळाला.

याच दरम्यान त्यांनी एका महत्वाच्या मुद्द्यावर सरकारला पाठींबा देतांना राजकीय तडजोड केली. ती म्हणजे नंदुरबार जिल्ह्याची निर्मिती सरकारने केली तर पाच वर्षे पाठींबा देण्याचा शब्द त्यांनी दिला. यावर सरकारचा रिमोट कंट्रोल म्हणून ज्यांची ओळख होती, ते म्हणजे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) आणि शिवसेना भाजप युतीचे जनक म्हणून ज्यांची ओळख होती, ते भाजपाचे राष्ट्रीय नेते प्रमोद महाजन (Pramod Mahajan) यांच्यापर्यंत धुळे -नंदुरबार नवीन जिल्हा निर्मिती करण्यासंदर्भात विषय चर्चिला गेला. यावेळी डॉ. गावित यांनी नंदुरबार जिल्हा वेगळा केला, तर राजकीय आणि भौगोलिकदृष्या कोणता फायद्याचा होईल, याची माहिती दिली. अन अखेर जुलै 1998 मध्ये नंदुरबार जिल्हा निर्मितीला मंत्रिमंडळाने मान्यता दिली.

नवीन नंदुरबार जिल्ह्याचा उदय  झाला. त्यानंतर नंदुरबार जिल्ह्याच्या राजकारणाच्या क्षितिजावर एक लखलखणारा तारा म्हणून त्यांचे नाव घेण्यात येऊ लागले. तेव्हापासून आतापर्यंत विजयकुमार गावित म्हणजे नंदुरबार जिल्हा, अन नंदुरबार जिल्हा म्हणजे विजयकुमार गावित हे एक समीकरण होवून गेले. ते ज्या पक्षात जातील त्या पक्षाचा तो नंदुरबार जिल्हा राहिलेला आहे. तेथील सर्व राजकीय गणितं त्यांच्या अवतीभोवती फिरत असतात. त्यांना सोबत घेतल्याशिवाय जिल्हा परिषद, बाजार समित्या, पंचायत समित्या, नगर पंचायत, नगर परिषद निवडणुकीचे समीकरण जुळत नाही.

सन 1999 मध्ये शिवशाहीचे सरकार गेल्यानंतर राज्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने विलासराव देशमुख यांच्या नेतृत्वाखालील सरकार स्थापन केले. तेव्हा मात्र विजयकुमार गावित यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तिकिटावर विधानसभा निवडणूक लढविली. यावेळी त्यांनी संपूर्ण जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसमय (NCP) केला होता. या काळात त्यांना सरकारमध्ये  संधी मिळाली. ते राज्यमंत्री झाले. मार्च 2001 ते जुलै 2002 या दरम्यान समाजकल्याण, सामान्य प्रशासन, दारूबंदी प्रचार कार्य खात्याचे राज्यमंत्री म्हणून त्यांनी काम पाहिले. जुलै 2002 ते ऑक्टोबर 2004 या काळात त्यांनी पुन्हा सामान्य प्रशासन, माहिती व जनसंपर्क, आदिवासी विकास, सामाजिक न्याय, भटक्या विमुक्त जाती व इतर मागासवर्ग कल्याण, राजशिष्टाचार खात्याच्या राज्यमंत्री पदाची जबाबदारी पार पाडली.

हे स्पष्ट करण्याचे कारण म्हणजे शांत बसणे हे त्यांच्या स्वभावात नाही. जी जबाबदारी मिळेल, त्याला न्याय देण्याचं कर्तव्य ते पार पडतात. सामान्य प्रशासन विभागाचा पदभार स्वीकारतांना सरकारी भरतीमध्ये मागासवर्गीयांचा संपूर्ण अनुशेष भरण्याची एक मोठी मोहीम त्यांनी हाती घेतली होती. त्या काळात सामान्य प्रशासन विभागातील काही खोडकर अधिकारी अनुसूचित जाती, जमातीची नोकरी भरती करायला टाळाटाळ करायचे. हे डॉ.गावित यांच्या लक्षात यायचे. प्रत्येक विषयावरील बारकावे आणि खाचा-खोचा त्यांना माहिती असल्याने, मग त्यांनी अनेक अधिकाऱ्यांना पद भरती थांबविल्याने  ‘कारणं दाखवा’ नोटीसा बजावल्या होत्या. तुम्ही मागासवर्गीयांची भरती आणि पदोन्नती टाळून संविधान विरोधी काम करू शकणार नाही, असे ते अधिकाऱ्यांना ठणकावून सुनवायचे.

या पद्धतीने अनेक वेळा त्यांनी अधिकाऱ्यांना  सुतासारखे सरळ केले. याबाबत अनेक वेळा थेट मुख्यमंत्र्यांपर्यत तक्रारी पोहोचविल्या गेल्या. मात्र  तत्कालीन मुख्यमंत्र्यानी डॉ. विजयकुमार गावित यांच्या भूमिकेचे समर्थनच केले. अन् मागासवर्गीयांच्या अनुशेषानुसार भरती घटनेच्या चौकटीत राहून झाली पाहिजे असे मुख्यमंत्री म्हणायचे. त्यामुळे  रखडलेल्या भरतीच्या  जाहिराती वर्तमानपत्रात येऊ लागल्या. त्यामुळे त्यांचे  मोठे योगदान मागासवर्गीय भरती आणि पदोन्नती प्रक्रियेत होते. हे अनेकांना कदाचित माहित नसावे.

त्यांची प्रशासनातील पकड बघून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) हे एकदम खुष झाले होते. यामुळे डॉ. विजयकुमार गावित यांना सुद्धा त्यावेळी पवारांनी थेट मंत्रिमंडळात पदोन्नती दिली. त्यांना राज्यमंत्र्याचे  कॅबिनेट मंत्री केले. नोव्हेंबर 2004 ते ऑक्टोबर 2009 या कालावधीत कॅबिनेट मंत्री पदाचा दर्जा देवून संपूर्ण आदिवासी विभागाची जबाबदारी त्यांच्यावर सोपविली. त्या काळात त्यांनी आदिवासी समाजासाठी अनेक क्रांतिकारक निर्णय घेतले. आदिवासी कुटुंबांना मोफत गॅस पुरवठा योजनेची खरी सुरुवात डॉ. विजयकुमार गावित हे आदिवासी खात्याचे मंत्री झाल्यावर झाली. याचा फायदा मोठ्या प्रमाणात आदिवासी कुटुंबांना झाला होता. त्यानंतर त्यांचे अनुकरण इतर राज्यांनी सुद्धा केले होते.

आदिवासी मुलींना हवाई सुंदरीचे मोफत प्रशिक्षण, आदिवासी मुलांना मोफत पायलट प्रशिक्षण अशा योजना सुद्धा राबविण्याचे   धाडस त्यांनी आपल्या काळात केले होते. त्यांनी आपल्या कार्यशैलीतून समाजाला स्वतंत्र ओळख करून दिली. आदिवासी समाजातील जीवनमानात आमुलाग्र बदल करण्यासाठी महत्वाचे निर्णय घेतले. आपले एक खास ‘रोल मॉडेल’ बनविले. अल्पवधीतच आपल्या कार्याचा ठसा  त्यांनी आदिवासी विकास खात्यावर उमटविला.

नोव्हेंबर 2009 ते 19 मार्च 2014 या काळात त्यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सरकारमध्ये वैद्यकीय शिक्षण, पर्यटन आणि फलोत्पादन खात्याचे कॅबिनेट मंत्री म्हणून काम करतांना वैद्यकीय क्षेत्रात मोठे बदल केले. याकाळात शरद पवारांनी  डॉ गावित यांना गृह खात्याची ऑफर दिली होती, असे समजते. कारण मागासवर्गीय आणि दुर्गम भागातील प्रतिनिधित्व करणाऱ्या व्यक्तीने राज्याचे गृहमंत्री का होवू नये, अशी पवारांची विचारधारणा होती. मात्र त्यांनी त्या ऑफरला नम्रपणे नकार दिल्याचे कळते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अनेक महत्वाच्या बैठकांना जेव्हा जेव्हा शरद पवार मार्गदर्शन करायचे, तेव्हा तेव्हा पवार हे आपल्या जिल्ह्यात कसे काम करायचे, जिल्ह्यावर आपली पकड कशी असली पाहिजे, जिल्ह्यात पक्ष बांधणी कशी करायची हे डॉ. विजयकुमार गावित यांच्याकडून शिकावे, अशा शब्दांत त्यांच्या कार्याची ओळख करून देतांना, मी – मी म्हणणाऱ्या  अनेक प्रस्थापित नेत्यांचे बैठकीत अप्रत्यक्ष कान उपटायचे.

आपल्या संपूर्ण मंत्री पदाच्या कार्यकाळात डॉ. विजयकुमार गावित यांनी नंदुरबार जिल्ह्यातील विकासाकडे कधी दुर्लक्ष केले नाही. त्यांना कबड्डी, मैदानी खेळ, बास्केट बॉल आणि खो खो या खेळांची  प्रचंड आवड. आपल्या कॉलेज जीवनात त्यांनी अनेक  कबड्डी आणि बास्केट बॉल टीमचे नेतृत्व केले. म्हणूनच  जिल्ह्यातील आदिवासी समाजातील मुलामुलींना आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळात प्रोत्साहन देण्यासाठी त्यांनी भव्य क्रीडा संकुल उभे केले. ते स्वतः डॉक्टर आहेत.  एम. बी. बी. एस. आणि एम. डी. (मेडिसीन) क्षेत्रात त्यांनी शिक्षण पूर्ण केले. औरंगाबाद आणि मिरज येथे डॉक्टर म्हणून त्यांनी नोकरी सुद्धा केली. त्यामुळे आपल्या दुर्गम आदिवासी भागात आरोग्य क्षेत्रात आदिवासी समाजातील विद्यार्थ्यांनी  सुद्धा उच्च शिक्षण घ्यावे म्हणून वैद्यकीय शिक्षण खात्याची जबादारी पार पाडतांना त्यांनी नंदुरबार जिल्ह्यात आपले राजकीय वजन वापरून मेडिकल कॉलेज आणले.

या कॉलेजमध्ये आदिवासी समाजाच्या विद्यार्थ्यांना 80 टक्के जागा राखीव, तर उर्वरित 20 टक्के जागा इतर समाजातील विद्यार्थ्यांना देण्याचा विशेष नियम करून घेतला. तसेच शंभर खाटांचे उत्कृष्ट असे आधुनिक शासकीय रुग्णालय बांधले. आदिवासी समाजातील विद्यार्थ्यांनी शेती क्षेत्रात सुद्धा पुढे येण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला. म्हणून त्यांनी आपल्या जिल्ह्यासाठी  शासकीय कृषी महाविद्यालय बांधले. पर्यटन मंत्री पदाची जबाबदारी त्यांच्याकडे असताना निसर्ग सौंदर्याने नटलेल्या नंदुरबार जिल्ह्यातील अनेक पर्यटन स्थळांचा विकास केला. त्यांना भरपूर निधी देऊन तेथील पायभूत सुविधा उभ्या केल्या. त्यामुळे आज जरी हा जिल्हा आदिवासी बहुल असला तरी पर्यटनासाठीचे एक आकर्षण आहे. आदिवासींची लोकसंस्कृती जतन आणि संवर्धन करण्यासाठी नंदुरबार मध्ये शानदार नाट्यगृह उभे केले. त्यामुळे हा स्वतंत्र जिल्हा घोषित झाल्यापासून नंदुरबार शहर व जिल्ह्याचे स्वरुप त्यांनी बदलून टाकले. जिल्ह्याचा कायापालट करण्यासाठी मोठे योगदान दिले.

असे म्हणतात की, आतापर्यंत ज्या – ज्या जिल्ह्यांचे विभाजन झाले, त्या त्या जिल्ह्यांत पायभूत सोयीसुविधांची मोठी वाणवा आहे. मात्र आदिवासी बहुल असलेल्या नंदुरबार जिल्ह्यातील विकासाला डॉ. विजयकुमार गावित यांनी एक निश्चित दिशा दिली. स्वकर्तृत्वाने आपल्या जिल्ह्यावर अधिराज्य गाजविले.

पुढाऱ्याला कधी कॉन्ट्रॅक्टर करायचे नाही. अन कॉन्ट्रॅक्टरला कधी पुढारी बनवायचे नाही, हे तंत्र जो नेता जोपसतो, तोच नेता आपल्या राजकीय जीवनात यशस्वी होतो. हे राजकारणातील सूत्र त्यांनी पाळले. त्यानुसार  डॉ. विजयकुमार गावित यांनी आतापर्यंतच्या आपल्या राजकीय कारकिर्दीत कोणत्याही शैक्षणिक संस्था किवा मेडिकल कॉलेज उघडले नाही. आजूबाजूला कोणी राजकीय दलाल उभे केले नाहीत. ते थेट जनतेच्या संपर्कात राहिले. आज ज्यांचा वैद्यकीय व्यवसायाशी काडीमात्र संबंध नसतांना, असे अनेक नेते मेडिकल कॉलेज उघडून बसले आहेत. मात्र डॉ विजयकुमार गावित स्वतः एमबीबीएस असूनही त्यांनी एकही वैद्यकीय शैक्षणिक संस्था त्यांच्या नावावर सुरू केली नाही. त्यांचा जास्त विश्वास शिक्षणावर आहे. शिक्षण हे वाघिणीचे दुध आहे. शिक्षणातून क्रांती घडू शकते. हे त्यांना चांगल्या प्रकारे ज्ञात असल्याने आज त्यांनी आपल्या दोन्ही कन्यांना डॉक्टर बनविले. त्याच बरोबर त्यांना राजकारणांचे धडेही दिले आहेत.

म्हणून जेव्हा नंदुरबार जिल्हा विकासाचा मुद्दा पुढे येईल, तेंव्हा या जिल्ह्याच्या निर्मितीचे जनक म्हणून डॉ. विजयकुमार गावित यांचे नाव पहिल्या पानावर सुवर्णाक्षरांनी लिहिलेले असेल, यात तिळमात्र शंका नाही.

Khanduraj Gaikwad

Khanduraj Gaikwad

About Author

खंडूराज गायकवाड हे गेल्या २७ वर्षापासून मंत्रालय पत्रकारीता करत आहेत. ते लोककला क्षेत्रातही काम करतात आणि त्यांनी पत्रकारीतेच्या माध्यमातून असंख्य लोक कलावंतांना न्याय मिळवून दिला आहे.

1 Comment

  1. Avatar

    Vishnu Patil

    August 23, 2024

    Khupach chaan

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात