मुंबई – नॅशनल हेराल्ड प्रकरणातील मालमत्ता हडपल्याच्या आरोपावरून काँग्रेसच्या तथाकथित आंदोलनावर भाजपाने कडाडून टीका केली आहे. काँग्रेसचे हे आंदोलन केवळ बेगडी असून त्यांना आंदोलनाचा अधिकार आहे, पण कोणाचीही मालमत्ता लाटण्याचा अधिकार नाही, अशा शब्दांत भाजपचे ज्येष्ठ नेते व माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब पाटील दानवे यांनी बुधवारी प्रदेश कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत काँग्रेसवर घणाघात केला. यावेळी प्रदेश माध्यम विभागप्रमुख नवनाथ बन हे उपस्थित होते.
“नॅशनल हेराल्ड ही गांधी घराण्याची जहागीर नव्हती”
पाटील दानवे म्हणाले, “१९३७ साली ५ हजार स्वातंत्र्यसैनिकांनी उदात्त हेतूने सुरू केलेले नॅशनल हेराल्ड हे वर्तमानपत्र आणि त्याची मूळ कंपनी ‘असोसिएटेड जर्नल्स लिमिटेड’ ही कधीही नेहरू-गांधी घराण्याची मालमत्ता नव्हती. मात्र, काँग्रेसने ‘यंग इंडिया’ नावाची कंपनी स्थापन करून या संस्थेची मालमत्ता हडपण्याचा डाव रचला. हे स्पष्टपणे आर्थिक गैरव्यवहाराचे प्रकरण आहे.”
“पक्ष निधी खासगी संस्थेला देणे बेकायदेशीर”
“२००८ मध्ये जेव्हा नॅशनल हेराल्डचे प्रकाशन थांबले, तेव्हा काँग्रेसने या संस्थेला तब्बल ९० कोटींचा निधी दिला. कोणत्याही पक्षाने खासगी संस्थेला निधी देणे हे कायदेशीर नव्हे, तरीही काँग्रेसने नियमबाह्य पद्धतीने निधी दिला,” असा आरोप त्यांनी केला.
“सुब्रमण्यम स्वामी यांच्या याचिकेवरून चौकशी सुरू”
“२०१२ साली भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी या प्रकरणी काँग्रेस नेत्यांवर आर्थिक फसवणुकीचा आरोप करत न्यायालयात याचिका दाखल केली होती. यामध्ये ‘यंग इंडिया प्रायव्हेट लिमिटेड’ने फक्त एक टक्का हिस्सा ठेवून ९० कोटी २५ लाख रुपये वसूल करण्याचा मार्ग स्वीकारला, जो नियमांना विरोधात होता. आता या प्रकरणात कोर्टाच्या निर्देशांनुसार सरकारी यंत्रणांकडून चौकशी सुरू असून पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे,” असेही पाटील दानवे यांनी स्पष्ट केले.