हिंदी प्रसार माध्यमांतून खोटे नॅरेटिव्ह पसरवण्याचा आरोप
मुंबई: तब्बल नऊ वर्षांनंतर झालेल्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत गुरुवारी झालेल्या मतदानाला मराठी मतदारांसह अल्पसंख्यांक, तरुण-तरुणी आणि महिलांनी मोठ्या संख्येने प्रतिसाद दिल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपच्या नेत्यांमध्ये धडकी भरल्याचे चित्र दिसत आहे. विशेष म्हणजे दोन्ही ठाकरे बंधूंच्या आवाहनाला मतदारांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याने भाजपची चिंता वाढल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.
या पार्श्वभूमीवर आता हिंदी प्रसार माध्यमे आणि भाजप समर्थक नेते, प्रतिनिधी यांच्याकडून भाजपच्या बाजूने निकालाची गणिते मांडली जात असल्याने संशय अधिक बळावला आहे. “महिला व तरुण मतदारांनी मोठ्या प्रमाणावर भाजपला मतदान केल्याने मुंबई महानगरपालिकेत भाजप-शिंदेसेना युतीला बहुमत मिळेल,” असा छातीठोक दावा काही हिंदी माध्यमांवर करण्यात येत आहे.
दरम्यान, मतदानादरम्यान अनेक मतदारांची नावे वेगवेगळ्या याद्यांत आढळल्याचे प्रकार समोर आले. काही तांत्रिक अडचणींमुळे संध्याकाळी पाच वाजल्यानंतरही अनेक मतदान केंद्रांवर मोठी गर्दी झाल्याचे वृत्त मराठी प्रसार माध्यमांतून सायंकाळी साडेसहापर्यंत दाखवण्यात आले. मात्र या बाबींकडे दुर्लक्ष करत हिंदी माध्यमांत भाजपच्या बाजूने एकतर्फी चित्र रंगवले जात असल्याचा आरोप होत आहे.
यासंदर्भात आकड्यांच्या अचूक विश्लेषणासाठी ओळखल्या जाणाऱ्या एका राजकीय विश्लेषकाशी संपर्क साधला असता त्यांनी तीव्र संताप व्यक्त केला.
“विरोधकांमध्ये संभ्रम निर्माण करणे ही भाजपची नेहमीची ‘मोडस ऑपरेंडी’ आहे. भाजपविरोधात काही बोलले की ते लगेच ‘फेक नॅरेटिव्ह’ हा शब्द वापरतात. आता त्याच शब्दाचा आधार घेऊन ते शेवटच्या क्षणी विरोधकांना हतबल करण्याचा प्रयत्न करत आहेत,” असे त्यांनी सांगितले.
विश्लेषकाने पुढे धक्कादायक दावा केला. “मतपेट्या सील झाल्यानंतर त्या निवडणूक आयोगाने नेमलेल्या ‘झोनल ऑफिसर’च्या ताब्यात जातात. माध्यमांतून आधी भाजपच्या बाजूने निकाल असल्याचा फेक नॅरेटिव्ह पसरवायचा आणि विरोधक मानसिकदृष्ट्या खचले की मतमोजणीवेळी आपल्याला हवा तसा निकाल जाहीर करून घ्यायचा – ही भाजपची खेळी आहे,” असा गंभीर आरोप त्यांनी केला.
आता उद्या होणाऱ्या मतमोजणीत या आरोपांमध्ये कितपत तथ्य आहे, हे स्पष्ट होणार आहे. मात्र काही हिंदी प्रसार माध्यमांनी आजच जणू निकाल जाहीर केल्यासारखे चित्र रंगवले असून, हे अंदाज खरे ठरले तर लोकशाहीवरच प्रश्नचिन्ह निर्माण होईल, अशी भीती राजकीय वर्तुळात व्यक्त होत आहे.

