मुंबई — “निवडणूक आयोगाच्या घोळामुळे नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकांचे निकाल लांबले आहेत. ज्या ठिकाणांचे निकाल प्रलंबित होते, तिथल्याच निवडणुका पुढे ढकलायला हव्या होत्या. पण आयोगाने चुकीच्या पद्धतीने व्यापक निर्णय घेतल्याने आता सर्वच निकालांवर परिणाम झाला,” अशा शब्दांत महसूलमंत्री आणि नागपूर–अमरावती जिल्ह्यांचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज निवडणूक आयोगावर कडाडून टीका केली.
ते म्हणाले, “राज्य सरकारने अनेकदा चर्चा केली, पत्रव्यवहार केला; पण आयोगाने कोणतीही दखल घेतली नाही. हा घोळ पूर्णपणे अनाकलनीय आहे. पुढे मोठ्या निवडणुका आहेत—म्हणून राज्य निवडणूक आयोगाने ही चूक तातडीने दुरुस्त करावी. केंद्रीय निवडणूक आयोगाने अहवाल मागवला आहे, म्हणजेच प्रकरण गंभीर आहे.”
विरोधकांकडून राज्य सरकारवर हस्तक्षेपाचे आरोप होत असताना बावनकुळे यांनी स्पष्ट केले, “राज्य निवडणूक आयोग ही स्वायत्त संस्था आहे. यात आमचा कोणताही हस्तक्षेप नाही. प्रत्येक गोष्टीत राजकारण करणे योग्य नाही.” 25 वर्षांच्या राजकीय कारकिर्दीत असा गोंधळ कधी पाहिला नसल्याचेही त्यांनी नमूद केले. मतदारांनी प्रचंड उत्साहाने मतदान केल्याचा उल्लेख करतांना ते म्हणाले, “महायुती आणि भाजपच्या बाजूने मतदान झाले आहे. विकासाच्या मॉडेलला जनतेचा कौल मिळाला. मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाला भरघोस पाठिंबा आहे. भाजपला ५१ टक्के मतदान मिळेल, याबद्दल मला पूर्ण विश्वास आहे.”
काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांच्या ‘केंद्रातील मोदी सरकार या महिन्याअखेर सत्तेतून बाहेर फेकले जाईल’ या वक्तव्यावर बावनकुळे म्हणाले, “चव्हाण संभ्रम पसरवू लागले आहेत. ते पिसाळले आहेत. त्यांचे राजकीय फटाके कायम फुसकेच निघाले आहेत.”
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) नेत्या खा. सुप्रिया सुळे यांनी केलेल्या आरोपांवर प्रतिक्रिया देताना बावनकुळे म्हणाले, “पराभव स्वीकारायला हवा. काही घटना असतील तर चौकशी होईलच. सर्वच मतदारांना दोषी ठरवणे अयोग्य आहे. ‘मतदारांनी सरसकट पैसे घेतले’ असे वक्तव्य म्हणजे लोकशाहीचा अपमान आहे.”

