X : @therajkaran
मुंबई – महाराष्ट्राच्या पंधराव्या विधानसभा अध्यक्षपदी आज राहुल नार्वेकर यांची एकमताने निवड झाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रस्तावांना अनुक्रमे अनिल पाटील, आशीष शेलार, चंद्रकांत पाटील यांनी अनुमोदन दिले.
आपल्या अध्यक्षपदी निवडीविषयी झालेल्या अभिनंदनपर भाषणानंतर आभार व्यक्त करताना अध्यक्ष नार्वेकर यांनी सर्व सदस्यांना समान संधी मिळेल, विरोधी बाजूची संख्या कमी असली तरी आपला आवाज कमी होणार नाही याची काळजी घेतली जाईल अशी ग्वाही दिली. सर्व सदस्य व आपण एकत्रितपणे शिस्त पालन करुन लोकशाही बळकट करु असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
अध्यक्ष नार्वेकर यांनी महाराष्ट्र भूमी संतांची, शूर वीरांची असा उल्लेख करताना छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज, डॉ.बाबासाहेब आंबेडकर, स्वातंत्र्यवीर सावरकर, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचेही स्मरण केले.या सभागृहाने नेहमीच उत्कृष्ट कामगिरी केली आहे, याबद्दल महाराष्ट्र विधानसभा व विधिमंडळाचा गौरवपूर्ण उल्लेख अनेक ठिकाणी केलेला आपण ऐकला आहे. या पंधराव्या विधानसभेतही तशीच उल्लेखनीय कामगिरी होईल असेही ते म्हणाले. या विधिमंडळाचे पहिले सभापती मावळंकर यांची निवड लोकसभेचे पहिले सभापती म्हणून झाली याचेही स्मरण अध्यक्ष नार्वेकर यांनी यावेळी केले.
अध्यक्ष नार्वेकर म्हणाले, या पंधराव्या सभागृहात सभात्यागावर भर न राहता, चर्चेवर राहावा. यावेळी 78 सदस्य प्रथमच आले आहेत. सर्वांना न्याय देण्याचा प्रयत्न राहील. विधिमंडळात जी जबाबदारी आपणावर आली ती प्रामाणिकपणे पूर्ण करण्याचा प्रयत्न केला. गेल्या सभागृहाचे अध्यक्षपद लाभले, यावेळीही ती पार पाडू. विधिमंडळात व परिसरात सुविधा निर्माण करण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी सहकार्य केले याबद्दल व अध्यक्षपदी निवड एकमताने केली याबद्दल अध्यक्ष नार्वेकर यांनी आभार व्यक्त केले.
मॅजेस्टिक आमदार निवास एक वर्षात आणि मनोरा आमदार निवास दोन वर्षांत सुसज्ज होऊन आमदारांना उपलब्ध होईल असेही त्यांनी जाहीर केले.