X : @NalawadeAnant
मुंबई – मालवण येथील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा (Chhatrapati Shivaji Maharaj) पुतळा कोसळण्याची घटना दुर्दैवीच असून यासंदर्भात आमच्या सह सर्वच शिवभक्तांच्याही भावना तीव्रच आहेत. त्यामूळे याच ठिकाणी शिवरायांच्या लौकिकाला व त्यांच्या कर्तृत्वाला साजेसा भव्य आणि अत्युत्कृष्ट पुतळा उभारण्याच्या दृष्टीने जेजे स्कूल ऑफ आर्टस (JJ School of Arts), आयआयटी (IIT), स्थापत्य अभियंते, महाराष्ट्रातील नामांकित शिल्पकार, तसेच नौदलाचे तांत्रिक अधिकारी यांची एक समिती देखील नेमण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी गुरूवारी येथे एका बैठकीत बोलताना सार्वजनिक बांधकाम विभागाला (PWD) दिले.
मालवण (Malvan) येथील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळण्याच्या दुर्दैवी घटनेसंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानी आज एक विशेष बैठक पार पडली. याच बैठकीत पुतळा कोसळण्यामागची कारणे शोधणे व एकूणच या दुर्दैवी घटनेसंदर्भात विस्तृत कारणमीमांसा करण्यासाठी स्थापत्य अभियंते, तज्ञ, आयआयटी तसेच नौदलाच्या अधिकाऱ्यांचा समावेश असलेली एक तांत्रिक संयुक्त समिती नेमण्याचाही निर्णय मुख्यमंत्री शिंदे यांनी घेतला. ही समिती नेमक्या जबाबदारी निश्चित करेल.
मुख्यमंत्री यावेळी म्हणाले की, झालेली घटना दुर्दैवी असून शिवभक्तांच्या भावना तीव्र आहेत. नौदलानेही हा पुतळा राजकोट येथे नौदल दिन साजरा करण्याच्या निमित्ताने एका चांगल्या भावनेने उभारला होता. मात्र आता भविष्यात आपल्याला अशी दुर्घटना परत कधीच घडू नये यासाठी अतिशय काळजी घेतली पाहिजे असे सांगून मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, उभारण्यात येणारा शिवरायांचा पुतळा त्यांच्या लौकिकाला साजेसा हवा. यासाठी कुठेही निधी कमी पडू दिला जाणार नाही, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केले.
…. तर १०० वेळा माफी मागेन…
बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री शिंदे यांनी घडलेल्या घटनेबद्दल सखेद दुःख व्यक्त करतानाच, याबद्दल मी राज्यातील जनतेची शंभर वेळा माफी मागतो. पण झालेल्या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन प्रथमतः राज्यात कायदा आणि सुव्यवस्था (Law and Order) अबाधित राखणे ही सर्वांचीच जबाबदारी असून विरोधकांसह कोणीही या घटनेवर राजकारण करू नये असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.