नंदुरबार
बऱ्याच वर्षापासून बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित असलेली नंदुरबार तालुक्यातील प्रकाशा-बुराई उपसा सिंचन योजनेला मंत्रालयीन स्तरावर व्ययअग्रक्रम समितीची रुपये ७९३.९५ कोटी किंमतीची म्हणजे सुमारे 800 कोटी रुपयांची प्रथम व सुधारित प्रशासकीय मान्यता मिळालेली आहे. आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे वारंवार भेट घेऊन केलेल्या प्रयत्नांना आज प्रत्यक्षात यश लाभले असून तापी बुराई क्षेत्रातील गावकऱ्यांमध्ये तसेच कार्यकर्त्यांमधून मोठा आनंद व्यक्त केला जात आहे.
या योजनेमुळे नंदुरबार तालुक्यातील अवर्षण प्रवण क्षेत्रातील दुष्काळी भागाला तसेच शिंदखेडा व साक्रीमधील दुष्काळी भागाला या योजनेचा फायदा होणार आहे. या योजनेमुळे नंदुरबार तालुक्यातील निंभेल, कंद्र, होळतर्फ, रनाळे, हाठमोहीदा, कोपर्डी, आसाने, खोकराळे, घोटाणे, न्याहाली, बलदाने, भादवड, मांजरे, बहयाने, शनीमांडळ, तिलाली, नलावाडे इत्यादी गावांना एकूण ४ हजार हेटक्र सिंचन क्षेत्राला तसेच शिंदखेडा व साक्री तालुक्यातील एकुण ३१०० हेक्टर सिंचन क्षेत्राला फायदा होणार आहे.
या भागातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरुपी मार्गी लावून विहिरीची भूजल पातळी वाढ मदत होऊन शेतकत्यांचे जीवनमान उंचावेल. याच हेतूने आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित आणि खासदार हिना गावित या योजनेचा सातत्याने पाठपुरावा करीत होते. विजयकुमार गावित यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन रखडलेल्या पाणी योजना विषयी सविस्तर चर्चा करून मार्गी लावण्याची विनंती केली होती. त्याचबरोबर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील विजयकुमार गावित यांना या प्रलंबित योजनेला न्याय देण्याचे आश्वासन दिले होते. विजयकुमार गावित यांनी केलेल्या त्या प्रयत्नांना आज यश लाभले असून सुमारे 800 कोटी निधीची मान्यता प्राप्त झाली आहे.