मुंबई
लोकसभा निवडणुकीपूर्वी महाराष्ट्रात काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. काँग्रेसचे माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांनी गुरुवारी (8 फेब्रुवारी) पक्षाचा राजीनामा दिला. बाबा सिद्दीकी यांनी सोशल मीडियावर याबाबत पोस्ट लिहिली. तरुणपणात भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षात सामील झालो आणि माझ्यासाठी हा 48 वर्षांचा प्रवास महत्त्वाचा आहे. आज मी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देत आहे. सांगण्यासारखं बरंच आहे, काही गोष्टी न सांगितलेल्या बऱ्या. या प्रवासात सहभागी झालेल्या सर्वांचे मी आभार मानतो, असं म्हणत त्यांनी काँग्रेसचा राजीनामा दिला.
गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या राजीनाम्याची चर्चा सुरू होती. बाबा सिद्दीकींचे वांद्रे पूर्व आणि पश्चिम भागात वर्चस्व आहे. त्यांचे बॉलिवूडमधील दिग्गजांशीही चांगले संबंध आहे. बाबा सिद्दीकींची इफ्तार पार्टी प्रसिद्ध असून यात सलमान खान, शाहरूख खानसह मोठमोठे सेलिब्रिटी हजेरी लावतात.
बाबा सिद्दीकींचा राजकीय प्रवास
बाबा सिद्दीकी यांचे वडील वांद्रे येथे घड्याळ बनवण्याचे काम करायचे. सिद्दीकीही त्या कामात वडिलांना मदत करत होते. अभ्यासादरम्यान राजकारणात रस निर्माण झाला आणि १९७७ मध्ये ते एनएसयूआय मुंबईचे सदस्य झाले. १९८० मध्ये त्यांना वांद्रे युवक काँग्रेसचे सरचिटणीस आणि 82 मध्ये अध्यक्ष करण्यात आले. त्यानंतर महापालिकेत प्रवेश झाला. त्यांनी तिथे स्वत:ला सिद्ध केले. निवडणूक लढवली आणि वांद्रे पश्चिम मतदारसंघातून सलग तीन वेळा विधानसभेत पोहोचले. 2004 ते 2008 या काळात ते मंत्रीही होते. सध्या त्यांचा मुलगा झिशान सिद्दीकी या जागेवरून आमदार आहे.