कल्याण
गेल्या कित्येक वर्षांपासून कल्याणात रखडलेल्या गृहप्रकल्पात भरडल्या गेलेल्या गुंतवणूकदारांच्या प्रश्नांसंदर्भात माजी आमदार नरेंद्र पवार यांनी नुकतीच रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे संचालक सतीश मराठे यांची भेट घेतली. कल्याणजवळील आंबिवली गावात ‘रामराज्य’ आणि ‘स्वराज्य’ हे इमारत प्रकल्प गेल्या कित्येक वर्षांपासून ठप्प पडले आहेत.
साधारणपणे दशकभरापूर्वी या गृह प्रकल्पांच्या जाहिराती आणि विकासकांच्या भूलथापांना बळी पडून तब्बल १ हजार ३०० कुटुंबांनी यामध्ये पैसे गुंतवले. यापैकी अनेक जणांनी आपापल्याकडे असणारी सर्व आर्थिक जमापूंजी, दागदागिने मोडून आणि बँकेकडून मोठमोठाली कर्ज काढून याठिकाणी पैसे गुंतवले. मात्र गेल्या एक दशकाहून अधिक काळ या तेराशे कुटुंबियांच्या पदरी घोर निरशेशिवाय काहीच पडलेले नाही. इतकी वर्षे उलटूनही ही सर्व कुटुंबे आजही आपल्या हक्काच्या घराची वाट पाहत आहेत.
आपल्याकडील सर्व पैसे याठिकाणी गुंतवले असूनही घर मिळण्याची आशा धूसर असताना दुसरीकडे बँकेकडून घेतलेल्या कर्जाचे हप्ते मात्र त्यांना आजही फेडावे लागत आहेत. त्यासाठी हप्त्याचा तगादा लावणाऱ्या या बँकेकडून कर्ज घेण्यासाठीही संबंधित विकासकांनीच भरीस पाडल्याचे निदर्शनास आले आहे. या सर्व पार्श्वभूमीवर विकासक आणि बँकेच्या संगनमताने गुंतवणूकदारांच्या झालेल्या फसवणूकप्रकरणी गुंतवणूकदारांना न्याय मिळावा. आणि बँकेच्या कर्जाचा बोज्यातून दिलासा मिळावा यासाठी आपण या गुंतवणूकदारांच्या प्रतीनिधिसह रिजर्व बँक ऑफ इंडियाचे संचालक सतीश मराठे यांची भेट घेत त्यांचे मार्गदर्शन घेतल्याची माहिती माजी आमदार नरेंद्र पवार यांनी दिली.
सतीश मराठे यांनी या गुंतवणूकदारांचे सर्व म्हणणे ऐकून घेतले असून याप्रश्नी मार्गदर्शन करण्याचे आश्वासन दिल्याचेही पवार यांनी सांगितले. तसेच हा प्रश्न आपण शेवटपर्यंत धसास लावून यावर तोडगा काढू आणि गुंतवणूकदारांच्या कुटुंबियांना न्याय मिळवून देऊ असा विश्वासही माजी आमदार पवार यांनी यावेळी व्यक्त केला आहे.