मुंबई – अर्थव्यवस्थेला नवा आयाम देणारे देशाचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांना आज विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी शोकप्रस्ताव संमत करून श्रद्धांजली वाहण्यात आली.
वंदे मातरम आणि राज्य गीताने विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय कामकाजाला प्रारंभ झाला. विधानसभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवनिर्वाचित आमदारांची ओळख सभागृहाला करून दिली. त्यानंतर माननीय राज्यपालांचे अभिभाषण सभागृहाच्या पटलावर ठेवण्यात आले. अभिभाषणानंतर सभागृहात आभार प्रदर्शन प्रस्ताव मांडण्यात आला. राज्यपाल अभिभाषणावर चर्चा ४ आणि ५ मार्च रोजी होणार आहे.
यानंतर उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांनी पुरवणी मागण्या सादर केल्या. ६ आणि ७ मार्च रोजी या पुरवणी मागण्यांवर चर्चा होणार आहे. त्यानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी योगेश सागर, संजय केळकर, बबनराव लोणीकर, रमेश बोरणारे, दिलीप बनकर, बाबूसाहेब पठारे, सुनील राऊत आणि अमित जनक यांच्या नावांची तालिका सभापती म्हणून घोषणा केली.
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी देशाचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग तसेच दिवंगत सदस्य प्रदीप जाधव-नाईक, मुकुंदराव मानकर, उपेंद्र शेंडे आणि तुकाराम बिरकड यांच्या निधनाबद्दल शोकप्रस्ताव मांडला. यानंतर सभागृहात दोन मिनिटे स्तब्धता पाळून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
यानंतर विधानसभा अध्यक्षांनी सभागृहाची बैठक स्थगित झाल्याचे जाहीर केले.