उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विधानसभेत ग्वाही
मुंबई – मुंबईतील रखडलेले झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प पूर्ण करून विस्थापितांना पुन्हा हक्काचे घर मिळवून देऊ, अशी ठाम ग्वाही उपमुख्यमंत्री व गृहनिर्माण मंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी विधानसभेत दिली.
खार पूर्व येथील गोळीबार भागातील २००३ पासून रखडलेल्या एसआरए प्रकल्पामुळे हजारो मराठी कुटुंबांना मुंबईबाहेर जावे लागले, अशी लक्षवेधी सूचना शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे आमदार वरुण सरदेसाई यांनी मांडली.
या प्रकल्पाची उर्वरित ५२८१ घरे डिसेंबर २०२९ पर्यंत पूर्ण करण्याचा विकासकाने आराखडा सादर केला आहे. मात्र, ठरलेल्या वेळेत काम पूर्ण न झाल्यास दंडात्मक कारवाई केली जाईल, असा स्पष्ट इशारा उपमुख्यमंत्री शिंदे यांनी दिला.
सरकार लवकरच झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प, रखडलेले गृहनिर्माण प्रकल्प आणि भाडेप्रश्नांवर संयुक्त बैठक घेणार आहे. तसेच, खार (पूर्व) येथील झोपडपट्टीधारकांवरील गुन्ह्यांची पडताळणी करून योग्य ती कारवाई केली जाईल, असेही शिंदे यांनी स्पष्ट केले.
पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी सांगितले की, विकासकाने फेब्रुवारी २०२४ पर्यंत झोपडपट्टी धारकांच्या भाड्यासाठी २०.५० कोटी रुपये अदा केले असून, आतापर्यंत १२२६ झोपडपट्टीधारकांच्या भाड्यासाठी १८.८१ कोटी रुपये प्राधिकरणाकडे जमा झाले आहेत.
सरकार मुंबईतील रखडलेल्या गृहनिर्माण प्रकल्पांना गती देण्यासाठी ठोस उपाययोजना करत आहे, त्यामुळे मूळ मुंबईकरांना शहराबाहेर जाऊ लागण्याची वेळ येऊ नये, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री शिंदे यांनी विधानसभेत दिली.