सव्वा कोटींचे नुकसान; अग्निशमन दलाच्या दिरंगाईमुळे संताप
वडवणी, बीड: वडवणी शहरातील चिंचवण रोडवरील पतंगे ट्रेडर्स या दुकानाला गुरुवारी सकाळी ७ वाजता अचानक भीषण आग लागली. ही आग आटोक्यात आणण्यासाठी तब्बल नऊ तास लागले. या आगीमध्ये अंदाजे १ कोटी २५ लाख रुपयांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
विशाल विलासराव पतंगे यांच्या मालकीचे बांधकाम, फर्निचर आणि कलर साहित्याचे हे मोठे दालन आहे. प्राथमिक अंदाजानुसार, विजेच्या शॉर्टसर्किटमुळे ही आग लागली. आगीने इतका उग्र रूप धारण केले की भिंतीवरील आणि स्लॅबच्या खालील प्लास्टर गळून पडले, तर दुकानातील सर्व साहित्य जळून खाक झाले.
आगीची माहिती मिळताच वडवणी नगरपंचायतीच्या अग्निशमन दलाची गाडी घटनास्थळी पोहोचली, मात्र गाडीत डिझेल नसल्याने आग आटोक्यात आणण्यास विलंब झाला. तब्बल अर्धा तास वाया गेल्याने आगीने भयंकर रूप घेतले. त्यानंतर बीड, माजलगाव आणि धारूर येथील अग्निशमन दलाच्या चार गाड्या दाखल झाल्या. अनेक तास प्रयत्न केल्यानंतर दुपारनंतर आग आटोक्यात आली.
वडवणी नगरपंचायतीच्या अग्निशमन दलात प्रशिक्षित कर्मचारी नसल्याने आग विझवण्यात अडथळे आले, असा आरोप नागरिकांनी केला. वेळीच योग्य यंत्रणा आणि कर्मचारी असते, तर कोट्यवधींचे नुकसान टाळता आले असते, अशी भावना नागरिकांनी व्यक्त केली. स्थानिकांनी जीव तोडून प्रयत्न केले, मात्र आगीची तीव्रता अधिक असल्याने नुकसान टाळता आले नाही.