मुंबई : मराठवाड्यात खालसा झालेल्या बेनामी जमिनी वाचवण्यासाठी राज्य सरकार कोणत्या उपाययोजना करणार आहे? असा सवाल विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी गुरुवारी सभागृहात उपस्थित केला.
दानवे यांनी सरकारवर गंभीर आरोप करत म्हटले की, महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांशी संगनमत करून खासगी व्यक्तींनी खालसा झालेल्या अनेक जमिनी स्वतःच्या नावावर करून घेतल्या आहेत. काही ठिकाणी तर या जमिनींवर अनधिकृत अतिक्रमणही झाले आहे.
ते पुढे म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयाने या जमिनी देवस्थानच्या ताब्यात द्याव्यात, असे स्पष्ट आदेश दिलेले असतानाही, सरकारने त्या वेगवेगळ्या वर्गवारीत हस्तांतरित केल्या आहेत. त्यामुळे सरकारच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
दानवे यांनी सरकारला इशारा देत म्हटले की, यापुढे खासगी व्यक्ती किंवा विकासकांच्या ताब्यात या जमिनी जाऊ नयेत, यासाठी सरकारने तातडीने प्रभावी उपाययोजना कराव्यात. तसेच, या प्रक्रियेत शेतकऱ्यांना त्रास होणार नाही, याची जबाबदारी सरकारने घ्यावी, असेही त्यांनी स्पष्ट केले.
त्यांनी खिदमत माजच्या संदर्भातही चिंता व्यक्त केली. वारंवार विश्वस्त बदल केल्यामुळे, विश्वस्त बदलल्यानंतरही खासगी व्यक्तींना देवस्थानच्या जमिनींवर इतर विकासकामे करण्याची संधी मिळू नये, अशी ठाम भूमिका दानवे यांनी सभागृहात मांडली.