मुंबई : ‘लाडकी बहीण’ योजनेतील पात्र महिलांना दरमहा ₹2,100 देण्याच्या घोषणेच्या अंमलबजावणीबाबत सरकारचे उत्तर समाधानकारक नसल्याने विधानसभेत प्रचंड गदारोळ झाला. संतप्त विरोधी सदस्यांनी विजय वडेट्टीवार यांच्या नेतृत्वाखाली सभात्याग केला.
राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) आमदार रोहित पवार यांनी सरकारला हा प्रश्न विचारला होता. सध्या मिळणारे ₹1,500 कधी वाढवून ₹2,100 केले जातील? यावर महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे उत्तर देत होत्या. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आमदार वरुण सरदेसाई यांनीही या मुद्द्यावर आक्रमक भूमिका घेतली.
मंत्री अदिती तटकरे यांनी उत्तर देताना “मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे योग्य वेळी निर्णय घेतील,” असे सांगितले. मात्र, या उत्तराने संतप्त झालेल्या विरोधकांनी सभागृहात गोंधळ घातला.
या प्रश्नावर 34 आमदारांनी सरकारला जाब विचारला होता. परंतु, अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी “मंत्री महोदयांनी समाधानकारक उत्तर दिले आहे,” असे सांगून पुढील चर्चेस नकार दिला. यामुळे संतप्त विरोधकांनी “धिक्कार” घोषणा देत सभात्याग केला.