मुंबई : “तुझसे नाराज नहीं जिंदगी, हैरान हूँ मैं…” या गाजलेल्या गीताच्या ओळी उद्धृत करत माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी अर्थसंकल्पीय चर्चेत आपल्या भावना व्यक्त करत सरकारवर टीका केली. “विदर्भातील काही जिल्ह्यांवर अधिकारी जाणूनबुजून अन्याय करत आहेत. हे ‘झारीतील शुक्राचार्य’ विकासाची गंगा आमच्या भागात पोहोचू देत नाहीत,” असा आरोप त्यांनी केला.
मुनगंटीवार यांनी अधिकाऱ्यांना स्पष्ट इशारा देत “एका शुक्राचार्याला डोळा गमवावा लागला होता, आम्ही विदर्भाचे आहोत, हे लक्षात ठेवा,” असे सणसणीत शब्दांत सूचित केले.
“काही अधिकारी उत्कृष्ट काम करतात, त्यांची टीम तयार करा, पण ‘चमको’ अधिकाऱ्यांना पायबंद घाला,” अशी सूचनाही त्यांनी सरकारला केली.
ते पुढे म्हणाले, “आम्ही केवळ निवडणुका जिंकण्यासाठी राजकारण करत नाही, तर राज्याच्या संसाधनांचा न्याय्य उपयोग व्हावा, ही आमची भावना आहे. काटकसर आणि आर्थिक शिस्त महत्त्वाची आहे, पण ज्या जिल्ह्यांचे दरडोई उत्पन्न कमी आहे, त्यांच्यावर अन्याय होऊ नये. आमच्या विभागाकडेही लक्ष द्या,” असा आग्रह त्यांनी धरला.